पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुणाला दिसत नाही. नाट्यछटेवर विवेचनात्मक मजकूर लिहिणाऱ्या समीक्षकांनाही हा मुद्दा जाणवलेला दिसत नाही. निदान यापूर्वी इतर कुणी या प्रश्नाचा उल्लेख केलेला माझ्या पाहण्यात नाही.
भाण : प्राचीन नाट्यप्रकार
 प्राचीन भारतीय रंगभूमीवर रूपकप्रकार म्हणून एकपात्री नाट्यप्रयोगांची परंपरा प्रदीर्घ आहे. या एकपात्री प्रमुख रूपकप्रकाराखेरीज उपरूपकांमध्ये विविध रसांतील एकपात्री उपरूपकांच्या परंपरा त्या काळी पुष्कळच विकसित झालेल्या दिसतात. उपरूपकप्रकार सोडले तरी मुख्य रूपकप्रकारात 'भाण' हा एकपात्री प्रयोग आहे. संवाद, स्वगत, आकाशभाषिते, परिक्रमा यांनी मिळून भाण या रूपक प्रकाराचे शरीर सिद्ध होते. हा अतिशय प्राचीन नाटकप्रकार आहे. भरतनाट्यशास्त्राच्या काळीच हा रूपकप्रकार प्रतिष्ठित झालेला होता. भरतांनीच दशरूपकात त्याचा उल्लेख केलेला आहे.
 नाट्यशास्त्राचा काळ विचारात घेतला तर भाण या नावाने अस्तित्वात आलेल्या प्राचीन संस्कृत नाट्यछटेचा आरंभ आपण सुमारे दोन हजार वर्षांइतका जना गृहित धरू शकतो. प्रयोगाच्या दृष्टीने लिहिल्या गेलेल्या, प्रयोग म्हणन यशस्वी होणाऱ्या नाट्यछटांची एवढी प्रदीर्घ परंपरा दिवाकरांच्या मागे उभी होती. या परंपरेची जर दिवाकरांना जाणीव झाली असती, तर मग नाट्यछटेसाठी ब्राउनिंगपर्यंत जाण्याची गरजही त्यांना वाटली नसती. नाट्यशास्त्रात असे म्हटले आहे की, भाण हा नाट्यप्रकार एकपात्री आणि एकअंकी असतो. संस्कृत नाटकांत अनेक प्रवेश असणारे अंक नसतात. म्हणून अंकाचे स्वरूप एकप्रवेशीच असते. भाणही एकपात्री, एकप्रवेशी, एकांकिका असते. भाणात पाच संधीपैकी मुख आणि निर्वहण असे दोनच संधी असतात. भाणामध्ये नाट्यान्तर्गत एकच व्यक्ती रंगभूमीवर असते. ही व्यक्ती विट असते. विट हे पुरुषपात्र आहे म्हणून भाणात गीत-नृत्याला प्राधान्य नसते. सगळे महत्त्व संवादांनाच असते. भाणाची प्रधानवृत्ती भारती असते. नाट्यशास्त्रात भाणाचा प्रधानरस कोणता, याचा उल्लेख नाही.
भाणाचे स्थळ
 परंपरेप्रमाणे भाणाचे स्थळ गणिकांची वस्ती म्हणजे वेश हे असते. विट हा

२३४/ रंगविमर्श