पान:युगान्त (Yugant).pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / नऊ




प्रस्तावना


  यातील दुसरा लेख 'गांधारी' जुलै १९६२ मध्ये लिहिला. त्या वेळी महाभारतातील व्यक्तींवर आणखी काही लेख मी लिहीन, अशी कल्पनाही नव्हती. एकातून एक ह्याप्रमाणे गेल्या पाच वर्षांत लेख लिहिले गेले. प्रत्येक लेख लिहिताना आता ह्यापुढचा लिहीन, अशी कल्पना नव्हती. तशा तऱ्हेचे लिखाण आता ह्या पुस्तकाबरोबर संपले, असेही नाही. प्रत्येक लेख लिहून झाला की वाटत होते की, हा लेख शेवटचाच! ह्यापुढे आता तेच-तेच येत राहणार. आता काही लिहायचे नाही. तशीच भावना ह्याही क्षणाची आहे. ती कायम राहते की परत आणखी काही मी महाभारतावर लिहिणार, हे आज काही सांगता येत नाही. माझ्या पुष्कळ मित्रांनी मी हे का लिहिले म्हणून विचारले. ह्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही. बोलण्यालाहण्यामागे माझ्या मते एकच हेतू- आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे हा. ही एक दबून न राहणारी प्राथमिक प्रवृत्ती आहे. ह्यापेक्षा जास्त काही हे लेख लिहिताना माझ्या मनात होते, असे मला आढळत नाही. पेशा