पान:युगान्त (Yugant).pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दहा / युगान्त

मास्तराचा असल्यामुळे आपण सांगतो ते इतरांना जास्तीत जास्त कळावे, अशी इच्छा, त्यामुळे विवरण स्पष्ट व सुबोध व्हावे, हा माझा कटाक्ष आहे, माझे लिखाण काय आहे, हे कळून त्यात एखाद्याला काही आक्षेपार्ह वाटले, चुकीचे वाटले व त्याने त्याप्रमाणे म्हटले, तर मला काही दुःख होत नाही; पण माझे लिहिणे निष्काळजीपणाचे होऊन त्यातून निराळाच अर्थ निघत असला, तर मला वाईट वाटते. उदा, माझ्या एका मित्रांनी 'द्रौपदी'च्या शेवटी असलेल्या "पुढच्या जन्मी थोरला भाऊ हो, भीमा !" ह्या वाक्याचा अर्थ "पुढल्या जन्मी माझा ( द्रौपदीचा ) थोरला भाऊ हो," असा केला ह्याचे मला फार वाईट वाटले. माझ्या मनातील द्रौपदी पाच नवऱ्यांशी इमानाने वागणारी होती. शिवाय एखाद्या पुरुषाची बायको म्हणून राहून त्याच्यापासून मूल झाल्यावर त्याला पुढच्या जन्मी का होईना, "भाऊ हो,' हे म्हणणे मला अस्वाभाविक, दांभिक व सर्वतया अशक्य वाटते. म्हणून ह्या आवृत्तीत माझा आशय स्पष्ट करण्यासाठी "पुढच्या जन्मी पाचांतला थोरला भाऊ" असे शब्द घातले आहेत. माझ्या आशयाचा विपर्यास होईल. असे आणखी काही राहिले नसेल, अशी आशा आहे.
 मी महाभारताची भांडारकर इन्स्टिट्यूटने काढलेली संशोधित आवृत्तीच वापरलेली आहे. त्यामुळे पूर्वी आपल्याला महाभारतात आहेत अशा वाटत असलेल्या बऱ्याच गोष्टी गळल्या आहेत. लेखांत ठिकठिकाणी त्या नमूद केलेल्या आहेतच. त्याशिवायही ह्या आवृत्तीत राहिलेल्या पण उघड-उघड मागाहून घुसलेल्या गोष्टीही पुष्कळ आहेत. ह्याचे कारण सध्याची 'भांडारकर - आवृत्ती' ही सर्व हस्तलिखिते तपासून झाल्यावर जुन्यांत जुन्या हस्तलिखितावर आधारलेली आहे हे. जुन्या हस्तलिखितांत सर्वस्वी नाही, पण इतर हस्तलिखितांतून काहींत आहे, काहींत थोडेसे आहे, असे जर काही असेल, तर ते ह्या नव्या आवृत्तीत काढून टाकलेले आहे. आपल्याला नव्या आवृत्तीने जे दिले, ते संपादकांना मिळालेल्या