पान:युगान्त (Yugant).pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ४५

अर्थ होता. अर्थात ह्या सर्व प्रकरणात राजाला बिचारा ( दीन ) म्हणायचे व माद्रीला दोष लावायचा, हे न्यायबुद्धीला धरून नव्हते. कुंतीचा तोल गेला होता.
 माद्रीला मरणाशिवाय वाटच नव्हती. तिच्या स्वतःच्या दृष्टीने नव्हती, पुढच्या कथेच्याही दृष्टीने नव्हती. हस्तिनापुरात सत्यवती, अंबालिका अशा आजेसासू व सासू विधवा होत्या. त्यात ही आणखी. पुरुषांचा सहवास बाजूलाच. ते कधी तिला दिसलेही नसते. त्या मानाने हिमालयातील आयुष्य बरे होते. स्वतःला जाळून घेण्याखेरीज तिला मार्ग नव्हता. आपल्याकडे कमीपणा घेऊन, कुंतीला मोठेपणा देऊन, अंबेसारखा तळतळाट न करता सुकुमार माद्री मृत्यूच्या स्वाधीन झाली.
 कुंतीचे खडतर आयुष्य पुढे सुरू झाले. हस्तिनापुरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहून नागरिक चर्चा करीत होते की, "ही मुले त्याचीच आहेत का ? त्याची कुठली असायला ? हो, त्याचीच बरे." ही चर्चा ऐकून कुंतीला काय वाटले असेल ? बरोबर ब्राह्मण व ऋषी होते. पांडू- माद्रीची प्रेते होती. भीष्माने सर्वांचा मान केला. राजाच्या वैभवानिशी पांडूचे व माद्रीचे अंत्यसंस्कार केले. हस्तिनापूरच्या राजकुलात व सबंध नगरभर सुतक पाळले गेले. ह्यामुळे पांडूच्या मुलांच्या राजपुत्रत्वाला मान्यता मिळाली व चुलत- भावंडांबरोबर शिक्षणास आरंभ झाला. कुंतीने सुटकेचा निःश्वास टाकला असणार.
 पण तो निःश्वास ती टाकते, तो नवी संकटे उभी राहिली. पांडव राजपुत्र गणले गेले, तरी राज्याचे एकमेव वारस म्हणून त्यांचा उल्लेख झाला नाही. राज्याभिषेक न होताच धृतराष्ट्र राजा होऊन बसला. कुंतीची काही वर्षे- मुले जाणती होईपर्यंतची - सुखात नाही, तरी बरी गेली असतील. पण तेव्हाही मुलांची जपणूक असणारच. मुले विद्या शिकायला लागली, तेव्हापासून कुरबुरीला सुरुवात झाली. कुंतीचा भीम दांडगेश्वर होता. तो आपल्या चुलत-