पान:युगान्त (Yugant).pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४६ / युगान्त

भावांच्या खोड्या काढी. ती झाडावर चढली, की झाड गदगदा हलवून त्यांना खाली पाडी. मारामारी तर होतच होती. त्यातच शस्त्रविद्या व अस्त्रविद्या- दोहोंतही पांडव आपल्या चुलत भावांपेक्षा वरचढ ठरले. भीमाखेरीज इतरांचा, विशेषतः थोरल्याचा वागणूक, शहाणपणा ह्यांबद्दलचा लौकिक वाढला. ह्यातही कुंतीचे शिक्षण असले पाहिजे. धृतराष्ट्राचे शंभर व पांडूचे पाच असे राजपुत्र होते. धर्म वडील होता; एवढेच नव्हे, तर शहाणा, देखणा, सुवृत्त, विद्यासंपन्नही झाला. तेव्हा तोच राजा होणार, अशी खात्री वाटल्यामुळे त्यांना राजधानीतून बाहेर घालवून, लोकांच्या दृष्टीआड करायचे दुर्योधनाचे व धृतराष्ट्राचे बेत सुरू झाले व युक्तीने त्यांना व कुंतीला वारणावताला पाठवून दिले. त्यांना लाक्षागृहात जिवंत जाळायचा दुर्योधनाचा बेत विदुराच्या शहाणपणामुळे टळला. ह्याही प्रसंगी कुंतीचे असामान्य धैर्य प्रत्ययास येते. रोज ब्राह्मणभोजन घालायचे, असा नियम करून तिने पुरोचनाला पुरे गाफील ठेवले. पांडवांनी स्वतःच घराला आग लावली व त्या घरात आपल्याऐवजी दुष्ट पुरोचनाची व त्याबरोबरच एका निरपराध निषादी बाईची व तिच्या पाच मुलांची आहुती दिली. परत या प्रसंगाने प्रश्न पडतो, 'हे कृत्य दुष्ट नव्हे का?' कारस्थानी भावांच्या हातून सहीसलामत सुटायचे, हा पांडवांचा हेतू. तो हेतू कुणाला तरी बळी दिल्याशिवाय साध्य होण्यासारखा नव्हता, हे या अध्यायात स्पष्ट केले आहे. उघड युद्धात मरण्याची तयार होती, पण कपटाने मारवून घेणे ही नामुष्की होती. त्यातूनही महाभारतात इतर ठिकाणी दिसून येणारा आपपरभाव येथेही दिसून येतो. जी बाई दारू पिऊन आपल्या मुलांबरोबर धुंद होऊन रात्रीची तेथे निजली होती, ती एक निषादी होती. सध्याच्या आवृत्तीत एक श्लोक आहे, त्यात म्हटले आहे की, "यदृच्छया मृत्यूने बोलावणे धाडल्याप्रमाणे आलेली कोणी एक निषादी त्या दिवशी तेथे आली व पिऊन धुंद होऊन तेथेच निजली." दोन निरनिराळ्या आवृत्त्यांत असलेले व प्रक्षिप्त