पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उदाहरणार्थ आपण शाडुचा गणपती करतो आहे. त्या मूर्तीमधील दोष काढायचे असल्यास ज्या ठिकाणी शाडू कमी पडला असेल तेथे त्याचा वापर करायचा. जेथे जादा झाला असेल तेथून तो कमी करायचा. पण वापर शाडुचाच करावा लागणार. तेथे माती किंवा लाकूड चालणार नाही. तसेच शरीर - मनाचे दोष समूळ दूर करायचे असल्यास पंचमहाभूतांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. शरीर मूर्ती मधील दोष काढण्यासाठी पंचमहाभूतात्मक शरीराचा वापर कसा करायचा याची पद्धत आहे. शरीरातील पंचमहाभूतांचे केंद्राला ताण-दाब दिल्यास तेथील स्नायू कार्यप्रवृत्त होतात. हा ताण-दाब कोणत्या प्रकाराचा, किती प्रमाणात आणि कोणत्या पद्धतीने द्यायचा याचे प्रशिक्षण स्नायूंना देणे म्हणजे सूर्यनमस्कार घालणे होय. तिच सूर्यनमस्कार साधना आहे. ही साधना व्यक्तीचा व व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास करणारी आहे. या पंचमहाभूतांच्या नैसर्गिक गुणांचा वापर सूर्यनमस्कारामध्ये करायचा आहे. संपूर्ण आरोग्य व आनंद मिळविण्यासाठी पंचमहाभूतांची मदत घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणूनच सूर्यनमस्कार साधना ही व्यक्तिमत्त्व विकासाची सर्वोत्तम साधना आहे. तिच्या मागील किंवा पुढील क्रमांकावर सूर्योपासनेची कोणतीच कायिक साधना नाही. ती एकमेव, अनन्य साधना आहे. संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे व्यक्ती-समष्टी- सृष्टी यांच्या विकासाला आधारभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक-मानसिक-बौद्धिक सर्व सुप्त व व्यक्त क्षमतांचा विकास करणे तसेच त्यांना विकार मुक्त करणे होय. शरीरातील पंचमहाभूतांच्या सहकार्यानेच हे शक्य आहे. या पंचमहाभूतांचा आविष्कार शरीरामध्ये विविधतेने नटलेला आहे. त्यामधील काही महत्वाचे अलंकार आहेत- पंचकोशात्मक पिंड, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेन्द्रिय, त्रिगुण, त्रिदोष, ऊर्जाचक्र, मन, बुद्धी, अहंकार इत्यादी. यातील प्रत्येकाचे शरीरातील स्थान, रचना, गुणधर्म, कार्यपद्धती, शरीर अवयवांवर पडणारा प्रभाव, त्यांची आवड-निवड / श्रेयस-प्रेयस, त्याचप्रमाणे त्यांच्यातील असंतुलन कशामुळे होते व ते समस्थितीमध्ये आणण्यासाठी काय करणे गरजेचे आहे या सर्वांचा समग्र भाव म्हणजे व्यक्ती. सर्वांगीण व्यक्तिविकासाचे हे विविध पैलू आहेत. सूर्यनमस्कार संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाचा मूलाधार आहे. ब्रह्मकर्म आहे. मेदवृद्धीतून मुक्ती - ३२