पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- सूर्यनमस्कार स्वयंसाधना शिकणे व इतरांना समजावून सांगणे हे सातत्याने गेली बारा-तेरा वर्षेसुरू आहे. या देवाण-घेवाणीतून माझी साधना समृद्ध होते आहे. दररोज पंधरा मिनिटे सूर्यनमस्कार साधनेसाठी दिल्यास आनंददायी आरोग्याचे संवर्धन व संरक्षण होते हा संदेश प्रभावी पद्धतीने सर्वदूर देण्यासाठी श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक या विश्वस्त संस्थेची स्थापना केली. सूर्यनमस्कार व संस्कृत भाषा हे कार्याचे अधिष्ठान ठेवून सर्व वयोगटातील स्त्री-पुरूषांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय विद्या-कला-क्रीडा यांचा प्रचार प्रसार करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. प्रत्येकाला सूर्यनमस्कार (स्वयं) साधना शिकण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या कार्यपुस्तिकेचा प्राथमिक उद्देश आहे. प्रत्येक साधकाने सूर्यनमस्कार कार्यकर्ता व्हावे हा याचा प्रगत हेतू आहे. समृद्ध - संपन्न भारत, विश्वविजयी भारत हे स्वप्न प्रत्येकाने पहावे, ते साकार करण्यासाठी वैश्विक कुटुंबातील प्रत्येक सदस्याने सूर्यनमस्कार यज्ञ दररोज करावा हे याचे अंतिम लक्ष आहे. कुटुंबातील एकानेच समृद्धीचे स्वप्न बघितले तर ते दिवा स्वप्न होते. पण एकच स्वप्न कुटुंबातील सर्व सदस्यांनी बघितले तर ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याची सुरूवात असते. आपणही या यज्ञात सहभागी होऊन दररोज आहुती टाकणार आहात. आपल्या अंतःकरणातील सूर्यतेजाला, आत्मारामाला सर्वभावे साष्टांग नमस्कार. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ मेदवृद्धीतून मुक्ती १६४