पान:मेणबत्त्या.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मेणबत्या.
भाग १ला.
प्रारंभीचा इतिहास.

 मेणबत्ती ही वस्तू जरी बऱ्याच प्राचीन काळापासून माहीत आहे, तरी पण स्वच्छ प्रकाश देणारी व पांढऱ्या रंगाची कठिण मेणबत्ती सन १८२५ पूर्वी तयार झाली नव्हती. पूर्वीचे लोक मेण ऊन करून वातीवर लावून मेणबत्ती तयार करीत असत. त्या कृतीवरूनच मेणबत्ती हा संयुक्त शब्द उत्पन्न झाला आहे असे दिसते. ते लोक मेण ऊन करून दोऱ्याच्या वातीवर लावून पाहिजे त्या जाडीच्या व लांबीच्या मेणबत्या तयार करीत असत. परंतु रसायनशास्त्रांत जसजसे अधिक शोध लागत चालले, तसतसे या कामीही चांगले शुद्ध व उपयोगी पदार्थ उत्पन्न होऊ लागले.
 हल्ली बाजारांत ज्या पांढऱ्या मेणबत्या मिळतात, त्या खरोखर मेणाच्या केलेल्या नसतात; परंतु स्निग्ध पदार्थातील कठिण व पांढया रंगाची आसिडे काढून त्यांच्या केलेल्या असतात. या पदार्थांचा शोध कोणी व कसा लावला याबद्दलची थोडी माहिती दिली असतां हुन्नरी लोकांस ज्यास्त उत्तेजन येईल व नवीन शोधाने मानवी समाजास सुख मिळून तो लावणारास कीर्ति व लक्ष्मी प्राप्त होते ते समजून उद्योगी होण्याची महत्वाकांक्षा उत्पन्न होईल.