पान:मेणबत्त्या.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०९


वरील प्रथमच्या चार मिश्रणांतील दरेकापासून दर शेकडा ५०-६६ भाग घट्ट स्निग्ध आसीड पहिल्या चार रीतींनी निघू शकते. बाकीच्या मिश्रणापासून त्यापेक्षा कमी कमी निघते. म्हणून पाश्चात्य लोक पहिल्या चार रीतींनी काम करण्यांत ती चार मिश्रणेच विशेष वापरतात. शेवटच्या ८ मिश्रणांतील दरेकापासून जरी स्निग्ध घट्ट आसीड वरच्या पेक्षा कमी कमी निघेल तरी पण धर्माभिमानी हिंदूलोकांत त्या मेणबत्त्यांचा खप फार होईल व बाकी राहिलेल्या पातळ आसिडाचें ६ व्या रीतीने पुनः घट्ट स्निग्ध आसीड बनविता येईल किंवा ते पातळ स्निग्ध आसीड साबूच्या कामी वापरता येईल. म्हणून ती मिश्रण मुद्दाम लिहिली आहेत. सबब प्रत्येक मेणबत्त्या करणाराने पान ३८ वर लिहिलेल्या रीतीप्रमाणे त्या आठ मिश्रणांपैकी जे वापरणे असेल त्यांत घट्ट स्निग्ध आसीड किती आहे, ते तपासून अथवा तपासवून नंतर कामास सुरुवात करावी असे मला वाटते.
 १ ली रीत--चुन्याच्या (Lime Saponification ) योगाने स्निग्ध पदार्थाची साबणक्रिया घडवून मेणबत्याचें घट्ट स्निग्ध आसीड तयार करणे.
 तीव्र आलकलीने स्निग्धपदार्थाची साबणक्रिया केल्याने त्यांतील ग्लिसराईन सुटे पडून स्निग्ध आसिडेंही निराळी होतात हा शोध मान. चिव्हरल यांणी लाविला होता. तीव्र पोट्याश सोडा व कळीचुना ह्या आलकली आहेत. परंतु किमतीने कळी चुना स्वस्त मिळतो व चुन्याच्या साबणक्रियेने झालेला साबू या कामी धुण्याच्या कामी लावावयाचा नसतो म्हणून कळी चुनाच वापरावा. या रीतीचे सामान्य दिद्गर्शन प्रथम करून नंतर चौकस पद्धतवार माहिती दिली असतां समजूत चांगली होईल. सबब तसे करतो.