पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मापाशी किना-यावर तुर्की सैन्य पराभूत होऊन परत चाललेल्या ग्रीक सैन्याकडे विजयी मुद्रेने पहात होते. त्यांच्या समोर पसरलेला समुद्र, तुर्की सैन्यास विजय मिळाल्यामुळे, आनंदाने उसळत होता. | कमालपाशांच्या अतुल विजयाची बातमी सर्व जगभर विद्युत्वेगाने पसरली. कमालपाशांनी आपल्या मूठभर सैन्याच्या साहाय्याने बलाढ्य ग्रीक सैन्यास धूळ चारली याबद्दल जगाच्या कानाकोप-यांतून धन्योद्गार निघू लागले. परचक्रापासून आपल्या राष्ट्रास वाचविल्याबद्दल त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होऊ लागला. आपल्या अभूतपूर्व पराक्रमानें कमालपाशांनी आपलें नांव जगाच्या इतिहासांत चिरंजीव केले असे धन्योद्गार सर्वत्र निघू लागले. कमालपाशा विश्रांतीकरितां उशाक येथे थांबल्यावर, ग्रीकांचा कमांडर-इन-चीफ जनरल ट्रीकोपीस याला त्याच्या दुय्यम सेनापतीसह पकडल्याची बातमी आली. कमालपाशांनी त्यांना आपल्यासमोर हजर करण्याचा हुकूम केला. त्यांना समोर घेऊन आल्याबरोबर कमालपाशांनी उत्थापन देऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्यांना मोठ्या आदराने कॉफी व सिगारेट दिल्या. याच अधिका-यांनी तुर्की शहरांची जाळपोळ करण्यास व तुर्की लोकांची कत्तल उडविण्याचा हुकूम दिला होता. १७