पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/81

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साम्राज्यान्तर्गत का साम्राज्याबाहेर ?

येण्याचा हा सुयोग आहे असें म्हटलें."इंग्रजी पंखाखाली इराक प्रगतीकडे मार्गक्रमण करीत असतां हिंदी राष्ट्राने आमच्यासाठी बरेच अधिकारी पुरविले आणि त्या सर्वांनी आपले काम इमानेइतबारे केले, हे कळविण्यास आम्हांस मोठा संतोष वाटतो. आमच्या शासनखात्यांत आजूबाजूच्या इतर बऱ्याच देशांतील परकीय अधिकारी आहेत. परंतु कर्तव्यतत्परतेंत, प्रामाणिकपणांत व मेहनतींत हिंदी लोकांच्या तोडीचे कोणीच अधिकारी आम्हांला आढळले नाहीत असे माझे आणि सर्व खात्यांतील वरिष्ठांचे मत आहे. सध्या सर्वत्र इराकी प्रजानन आम्ही कामावर नेमीत आहोत. म्हणून पूर्वीच्या हिंदी अधिकाऱ्यांना रजा देणे भाग पडत आहे. पण याचा अर्थ, आम्ही हिंदी. लोकांचा द्वेष करतों असा मुळीच करून घेऊ नका असे माझे आपणांस पुनः पुनः सांगणे आहे. इराकी सरकारांत हिंदी मंडळींनी फारच अमोलिक कामगिरी केली आहे आणि आम्हांला जेव्हा जेव्हा तज्ज्ञांची आवश्यकता लागेल तेव्हा तेव्हा इतर परकीय लोकांपेक्षा प्रथमतः आम्ही हिंदी लोकच पसंत करू हे लक्षात ठेवा. युद्धोत्तर काळांत इराकी सुशिक्षित प्रजानन बेकार हिंडू लागले, तेव्हा सरकारी जागा इराकी लोकांसाठीच आम्ही ठेवल्या तर त्यात कोणत्याही प्रकारचा असद्धेतु आमचेवर आपण लादूं नये. केवळ राष्ट्रीय वृत्तीने प्रेरित होऊनच हे काम आम्हाला करावे लागत आहे. हिंदी राष्ट्राचा आणि इराकचा संबंध आजकालचा नव्हे. शेकडो वर्षापूर्वीपासून ही दोन राष्ट्रे एकमेकांस परिचित आहेत. हिंदी राष्ट्रांत सर्वांगीण प्रगति होत आहे आणि त्यांतील लोकशाहीच्या विजयाकडे आमचे लक्ष लागले आहे."

 इतके बोलणे झाल्यावर मी काही प्रश्न विचारले. त्यांतील कांहीं निवडकच खाली उत्तरांसह दिले आहेत.

७५