पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

प्रश्न–इराकी प्रजेचे अंतिम ध्येय साम्राज्यांतर्गत स्वराज्य असे आहे का अगदी स्वतंत्र व्हावे असे इराकी जनतेस वाटते ?
 उत्तर--कोणत्याही मनुष्याच्या अंत:करणांत निर्भेळ स्वातंत्र्याच्याच भावना असणार आणि इराकी लोकांनाही तसेच वाटते. परंतु तूर्त ब्रिटिशासारख्या बलिष्ठ राष्ट्राशी संगनमत केल्याने इराकचा फायदा होणार असल्याने काही कालपर्यंत त्यांचा संबंध तोडतां येत नाही.
 प्रश्न-ईजिप्त, हिंदुस्थान व चीन या पौर्वात्य देशांच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चाललेल्या प्रयत्नांबद्दल आपले मत काय आहे ?
 उत्तर--बल्गेरिया, स्वित्झर्लंड, युगोस्लाव्हिया, बेल्जम, डेन्मार्क इत्यादि लहान राष्ट्रे जर युरोपांत स्वातंत्र्य भोगू शकतात तर, या मोठ्या देशांना ते का नसावे ? प्रत्येक मनुष्याने स्वतंत्र व्हावें हें राष्ट्रीयत्वाचे लक्षण आहे. सर्व राष्ट्रे स्वतंत्र झाली पाहिजेत म्हणजेच कोणी कोणावर स्वामित्व गाजविणार नाही असे मला वाटते.
 हे संभाषण चालू असतांना लहानसा कप पुढे करण्यांत आला. अशा वेळी नकार न देण्याविषयी आगाऊ सूचना मिळाली असल्याने त्याचा स्वीकार केला आणि तोंड वेंगाडत तो काफीचा कडू काढा पिऊन टाकला ! त्यांत दूध घालण्याची पद्धत नाही. भातुकली खेळताना मुली लहानसे कप घेतात त्याच आकाराचे कप कॉफीसाठी का वापरतात ते यावेळी कळलें.
 प्रश्न-मुस्तफा केमाल, अमानुल्ला आणि इराणाधिपति यांच्या देशांत पाश्चात्य सुधारणांचा प्रसार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्या दृष्टीने इराकांतील सरकार काय करणार आहे ?

 उत्तर--या तीनही थोर पुरुषांचे प्रयत्न स्तुत्य आहेत यांत शंका

७६