पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/157

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नादिरखानाचे अर्वाचीन महत्त्व

वर्चस्व स्थापण्यापलिकडे त्याला विशेष महत्व आमच्यादृष्टीने नाही. एका बाल राजवंशीयास हातीं धरून त्याला निमित्तमात्र करून नादिरने तेहरानचे तख्त आपणांसाठी मिळविलें ही गोष्ट प्रशंसनीय खरी, पण त्याने अवलंबिलेल्या मार्गामुळे त्याची थोरवी कमी ठरते. इराणी राष्ट्रीय स्मृतीच्या लेखकांनी नादिरशहाला इतकें चढविलें आहे की, शाळेंत न जाणारा मुलगाही 'नादिरशहाने इराणांत हिंदुस्थानांतून पुष्कळ द्रव्य लुटून आणले,' असें मोठ्या अभिमानाने सांगतो ! 'नादिरशहाची हिंदुस्थानवर स्वारी' हे चित्र, शिवाजीमहाराजांचे अनुयायांसहितचे रविवर्म्याचे चित्र आपणांस जितकें परिचयाचे आहे, तितकेंच इराण्यांच्या नेत्रद्वयांच्या ते ओळखीचें होऊन बसलें आहे. हा परिणाम फारा दिवसांचा नसून केवळ दहा बारा वर्षांतलाच आहे, ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नव्हे का ?

 नादिरशहा सुनी पंथानुयायी असल्याने किंवा अन्य कारणाने त्याला फारसा मान नसे. पण जागृत झालेल्या इराणी जनतेस हें पहावेना. मशहदपासून कांही अंतरावर आडरानांत एका खेडेगांवीं नादिरशहा पैगंबरधामास गेला होता. त्याच्या थडग्याकडे तोंपर्यंत कोणाचें लक्षही नव्हते. आता मशहदमध्ये एक मोठें उपवन त्याच्या स्मारकाप्रीत्यर्थ बांधण्यात आलें असून मध्यभागी त्याची कबर आणण्यांत आली आहे. एक चांगले वाचनालय व एक सभागृह त्या स्मारकास जोडलें असून लोकदृष्टीपासून दूर पडलेला नादिरशहा आता राजमार्गावर येऊन मशहदमधील यात्रेकरूंच्या व प्रवाशांच्या प्रेक्षणीय भागांपैकी एका स्थळी येऊन शयन करीत आहे ! श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि नादिरशहा यांचे युद्ध होणार असें प्रसिद्ध झालें असूनही कांही अपरिहार्य कारणामुळे तें घडून आलें नाही. तेवढ्याने त्या मराठा वीराची योग्यता कमी ठरत नाही.

१५१