पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/156

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

आहे यात शंका नाही. लुटारू जातां येतां मशहदमधून जात. आणि आपण आणलेली संपत्ति पापक्षालनाच्या हेतूने मशिदींसाठी देत! मुख्य मशीद म्हणजे हजरत इमाम रेझा यांच्या कबरीभोवती बांधली आहे. इमाम रेझा हे पैगंबराचे आठवे शिष्य होत. आणखीही बऱ्याच मोठ्या मुसलमानांच्या कबरी येथे आहेत. इस्लामेतरांस आंत जाण्याची सक्त बंदी आहे आणि मुसलमानी धर्माचे फाजील वेड व तज्जन्य रक्ततृष्णा हीं इराणांत कोठे आढळत असतील तर तीं या मशिदींतच ! हिंदुस्थानांतून आणि इतर मुसलमानी प्रदेशांतून शिया पंथाचे हजारो यात्रेकरू येथे प्रत्यही येत असतात.
 मशहदचे राजकीय दृष्ट्या महत्त्व कांही कमी नाही. हिंदुस्थानचे रक्षक मशहद येथे आहेत असें सांगितले तर वाचकांना खरे वाटणार नाही; पण ही गोष्ट अगदी सत्य आहे. फार तर वायव्य सीमाप्रांत अथवा बलुचिस्तान येथेच हिंदुस्थानचे द्वारपाल असावेत अशी अपेक्षा चुकीची होणार नाही; पण सुवर्णभूमींत प्रवेश करण्यापूर्वी पहिली देवडी लागते ती मशहद येथे. येथील संरक्षकांच्या संख्येवरून राज्यकर्त्यांना हिंदुस्थानसाठी किती दक्षता बाळगावी लागते, काय परिश्रम सोसावे लागतात याची कल्पना येईल.
 रशियाचेही वर्चस्व मशहदमध्ये कमी नाही. अफगाणिस्तानांतील हिरात या शहरी जाण्याचा रस्ता येथूनच असल्याने त्या देशचा मोठा राजकारणी वकील मशहद येथे सदैव असतो. प्रस्तुत प्रतिनिधी मशहदमध्ये असतांना अमानुल्लाची भगिनी व राणी सूरय्याची माता या हिरातहून मशहदला आल्या होत्या.

 नादिरशहा पूर्वी आपणांस नादीर--कुली म्हणजे दास नादीर ( गुलाम-बंदा ) असें म्हणवीत असें आणि लुटालूट करून आपलें

१५०