पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/140

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

तरी जनता या प्रदेशांत कोंबतां येईल. आणि तोच प्रकार मोठमोठ्या शहरांतून दिसतो. खुद्द तेहरानमध्ये तर जगांतील सर्व देशांच्या लोकांचें प्रदर्शन भरलें आहे असें वाटतें! जपानी, चिनी, तुर्कोमान, अफगाण, पंजाबी, फ्रेंच, इटालियन, तुर्की, इंग्रजी, जर्मन, स्वीडिश, अमेरिकन इत्यादिकांचे नमुने अगदी सहजगत्या पहावयास मिळतात. व्यापारांत आणि इतर ठिकाणीही रशियनांचे-‘लाल' बोल्शेव्हिकांचे-प्राबल्य विशेष आहे. कारकून मंडळींत खिस्तानुयायी आर्मीनियनांचा भरणा चटकन् डोळ्यांत भरतो. हिंदी 'मोटारहाके' इराणांत इतके नामांकित आहेत की, कोणी नवा हिंदी मनुष्य दिसला म्हणजे, 'तुमची स्वत:ची मोटार आहे का तुम्ही नोकर आहां?' असा प्रश्न हटकून विचारला जातो. कारण मोटारहाक्याशिवाय दुसरी हिंदी मंडळी क्वचितच इकडे येतात. आपणांकडे पहाण्याची इतर राष्ट्रांची दृष्टि लक्षात घेऊन तरी परराष्ट्रांत हिंदुस्थानसंबंधी चळवळ करण्याचें काम जारीने स्वीकारलें जावो!

 इराकांत आणि इराणांत बाजारांतील दुकानांची रचना एकसारखी असून एकदम डोळ्यांत भरणारी आहे. एकाला लागून दुसरें अशीं समोरासमोरील पडव्यांतून दुकानें मांडलेलीं असून तीं वरून आच्छादिलेलीं असतात. म्हणजे स्त्रिया जशा बुरख्यांत झाकून ठेवलेल्या असतात तशींच ही दुकानेंही वरून बंद असावयाची. सूर्यप्रकाशाचें वावड़े स्त्रियांना, तसेंच दुकानांना व दुकानदारांना सुद्धा! हवा जाण्यासाठी मधूनमधून गवाक्षे ठेवलेली असलीं तरी एकंदरीत अत्यंत हानिकारक अशीच ही पद्धति आहे असेंच कोणीही म्हणेल! मुंबईस मंगळदास मार्केटमध्ये अशा प्रकारचा थोडा अनुभव येईल. पण त्या मानाने मुंबईची दुकानें व मार्केटसुद्धा लहान पडतें! एकदा बाजारच्या

१३४