पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/139

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्बोधक आकड्यांचा अभाव

मुखप्रक्षालन करण्याची रीतच कोठे नसल्याने मधून मधून सोनेरी दात बसविलेला मनुष्य दिसतो; आणि दंतवैद्यांच्या पाट्या वाचतां येत नसल्या तरी दंतपंक्तींच्या चित्रांवरून त्यांचें प्राबल्य कळतें! पाण्याचा गलिच्छपणा, उष्टें खाण्याची पद्धत, थंडीमुळे चोहोकडून बंद असलेल्या खोलींत पुष्कळ जणांनी शेकत बसण्याची रीत, बुरखा, दंतधावनास फाटा अशा अनेक अहितकर चालींमुळे प्रजेचें आरोग्य रहावें कसें, असा प्रश्न कोणाही खोल दृष्टीच्या समाजसेवकास पडेल. परंतु त्यासंबंधी माहिती कोठून व कशी मिळणार?
 आकडेशास्त्र हें राजकारणी पुरुषांचें आणि व्यापारी तज्ज्ञांचें होकायंत्र आहे यांत तिलप्राय संदेह नाही. इतरांना किचकट आणि डोकें उठविणारे असे वाटणारे तेच तेच आकडे आर्थिक तज्ज्ञांना व मुत्सद्दयांना किती तरी महत्त्वाच्या मनोरंजक गुजगोष्टी सांगतात. पण इराणांत कोठेही आकडा मिळावयाचा नाही. आपल्याकडे लोकसंख्या तर आता साधारणपणे र-ट-फ करणारा मनुष्य देखील सांगूं शकतो, इतका या शिरोगणतीच्या आकड्यांचा प्रसार झाला आहे. पण इराणांत अद्याप एकही प्रसंग खानेसुमारीचा आला नाही आणि तो आणखी दहा बारा वर्षात येईल असें वाटत नाही! जेथे एकंदर लोक किती आहेत याचाच मुळी अंदाज नाही, तेथे मृत्युसंख्या, बालमृत्यूचें प्रमाण, जन्मांची होणारी वाढ, रोगांचा प्रसार इत्यादि आकड्यांची अपेक्षा करणें कितपत योग्य होईल? इतकें मात्र सत्य आहे की, तेहरान, हमादान, काझ्वीन किंवा इतर कोणतेंही शहर घ्या, तेथील लोकवस्ती वाढते आहे असें मानण्यास एकही कारण दिसत नाही.

  हिंदुस्थानच्या विस्ताराने इराण एकतृतीयांश असतां लोकसंख्या अदमासे सहा कोटीच आहे असें म्हणतात! तेंव्हा आणखी किती

१३३