पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/116

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

केवळ बर्फमय प्रदेशांतूनच आहे. मोटार बर्फ तुडवीत जाते. रस्त्याच्या बाजूला कोठेही पहा, बर्फाविना दुसरें कांही दृष्टीस पडणार नाही. यावेळी बाहेर हिंडणें म्हणजे किती कठीण काम; पण बर्फ दूर सारणारे कामगार आपले काम करीत असतातच! रस्त्यावर चुकन कोठे पाणी सांडलें तर अर्ध्या तासाचे आंत तें थिजतें आणि एखाद्या काचेच्या तुकड्याप्रमाणे दिसूं लागतें! टेकड्या, जमिनी, रस्ते यांच्यावर बर्फाशिवाय दुसरें कांहीच दिसत नाही. क्षितिजापर्यंत पांढरेंच पांढरें दृश्य पाहून संस्कृत कवींनी ठरविलेल्या संकेताची संयुक्तता पुरेपूर पटते. सत्कीर्तीचा रंग पांढरा शुभ्र आहे असें समजलें जातें. चराचर सृष्टीच्या चालकाची चतुरता स्पष्टपणे दर्शविणारी आणि त्या प्रेमळ पित्याची कीर्ति दिगंत पसरविणारी ही हिमशोभा किती अपूर्व दिसते हें शब्दचित्रांत रेखाटतां येणें शक्य नाही. इंद्रधनुष्याचे रंग रविवर्म्याला दिले असते तरीही, यशोध्वजाचा धवल वर्ण यथातथ्य त्याच्या हातून वठता ना! कारण इंद्रधनुष्यांत पांढरा रंग मुळी नाहीच! कविसंकेतानुसार हास्याचाही रंग पांढराच आहे. सर्वत्र पसरलेलें हें बर्फ म्हणजे परमेशाचें हास्य तर नव्हे ना? आपण केलेल्या साध्या लीलांपैकी सृष्टीच्या एकाही अल्प भागाचें कोडें मानवांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या तरी उलगडत नाही हें पाहून जगन्नियंत्याने का हसूं नये? आणि तसें न मानलें तरी अखिल ब्रह्मानंदाचे हें प्रतिबिंब होऊ शकेल. आनंदाचें पर्यवसान हास्यांत आणि त्या हास्याचा हा शुभ्र प्रकाशच चोहोंकडे पसरलेला असावा. अस्तु.

 काझ्वीन येथे येतांच उत्तर इराणांतील रशियन वस्तीचें वाढतें स्वरूप एकदम दिसून येतें. व्यापारी पेठेंतल्या बहुतेक पाट्यांवर रशियन अक्षरे आढळतात. इराणांतील उत्तर भागांत सर्वत्र रशियन

११०