पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



द्राक्षें 'पैशाला पासरी?'

टेकडीवर आहे ती सुमारे सात हजार फूट उंचीवर आहे. यावरून हमदानच्या हवापाण्याची कल्पना करावी. ग्रीककालीन इतिहासाशीं या शहरचा संबंध जोडतात; पण पुराणवस्तुखात्याला खात्रीलायक पुरावा मिळालेला नाही. हमदान हें इराणांतील नंदनवन म्हणतां येईल. पण ती सर्व शोभा केवळ वसंतऋतूंतच. प्रस्तुत कालीं बर्फाचे ढीग आणि घाणेरडा चिखल सर्वत्र असल्याने तेथील वास्तव्य कंटाळवाणें होतें. उन्हाळ्यांत सर्व प्रकारची फळें येथे विपुल आणि स्वस्त मिळतात. द्राक्षे तर 'पैशाला पासरी' असें म्हटल्यासच वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन होईल. त्यांच्या अनेक जाती असून उत्कृष्ट मानवी उपयोगास ठेवून बाकीच्या खेचर-अश्वादिकांना चारतात!
 हमदानहून तेहरानला जावयाचे म्हणजे मध्यंतरी काझ्वीन या गावावरून जाणें क्रमप्राप्त होते. काझ्वीनला महत्त्व आहे तें यासाठी की, हें कास्पियन समुद्राकडील व्यापाराचें ठिकाण आहे. इराणांतील प्रमुख बंदर पेहेलवी (पूर्वीचे नांव एंंझेली) आणि रेश्त हें व्यापारी शहर, या दोन्ही समीपस्थ गावांशी दळणवळण काझ्वीनमधूनच होतें. रेश्त हें समुद्रकिनाऱ्याजवळचे शहर. कास्पियन समुद्रांतील मासे उत्तर इराणांत आणि इतर सर्वत्र पाठविण्याचें काम एक रशियन कंपनी तेथून करते. त्यामुळे रेश्तचें महत्त्व विशेष आहे. जगांतील उत्तमपैकी मच्छीमाऱ्यांचा धंदा रेश्तचा असून तो फारा दिवसांपासून रशियाच्या ताब्यांत आहे. अगदी सुधारलेल्या शास्त्रीय पद्धतीने म्हणजे बर्फांत मासे गोठवून ते सर्वत्र पाठविले जातात. शाकाहारी हिंदूंना या शहरचे आणि तेथील व्यापाराचे महत्त्व कळणे शक्य नाही.

  काझ्वीन येथे येण्यापूर्वीही एक मोठा घाट लागतो आणि तोही सुमारे पंधरा हजार फूट उंचीचा आहे. हमदान ते काझ्वीन हा रस्ता

१०९