पान:मी भरून पावले आहे.pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'बॉसिंग' स्वभावात नाही. रात्रीचे उशीरा आले की मी दार उघडायची. मला झोप यायची नाही, का तर बाबा हे वर चढेपर्यंत सुखरूप येतात की नाही अशी मनात सारखी भीती असायची. त्यामुळे एक पायरी चढली की खट व्हायचं आणि मला जाग यायची. मी दार उघडायची. 'अजून तू झोपली नाहीस. का झोपली नाहीस? फाफा, ऊठ मला जेवण दे.' ती बहीण मग गरम करून जेवायला वाढायची. तेल डोक्यावर घालायची, पायाला तेल लावायची. ते म्हणायचे, भाभीला त्रास देऊ नको. भाभीला ऑफिसला जायला लागतं. ती रात्रीची जागायची. बरं, मी त्यांच्याशिवाय रात्रीचं जेवायची नाही. सगळं जेवण करायची आणि ते येईपर्यंत मी थांबायची. तर ते मला ओरडायचे की, 'हे काय, तू जेवलीस का नाही? माझ्यासाठी थांबलीस कशाला? माझं कामामध्ये मग मन लागत नाही.' कधी कधी लवकर आले ना तर म्हणायचे, 'मेहरू ग, आज लवकर आलो. तुझ्या नावाचा फायदा घेतला. मी म्हणालो, नको बाबा, आज बायकोच्या बरोबर जेवायचंय. बायकोनं सांगितलंय, लवकर या, नाही तर भांडण होणार, असं. एक पुस्तक वाचायचंय म्हणून आलो' आणि ते पुस्तक वाचताना दहा ओळी वाचायचे आणि त्यात काय असेल तर सांगायचे, 'मेहरू, या पुस्तकामध्ये काय आहे बघ.'

 'महंमद' नावाचं एक पुस्तक होतं. महंमद पैगंबरांविषयी माहिती होती. तेव्हा ते सांगायचे आणि म्हणायचे, 'अग बघ, पैगबरांबद्दल काय आहे?' आणि म्हणायचे, 'ही सगळी पुस्तकं आहेत ना, आपल्याला जर वाचायचं असेल ना मेहरू, तर आपण कुणाकडून उसनी घेऊन वाचायची नाहीत. विकत आणायची. आपल्या घरात ठेवायची आणि दहा वेळा वाचायची. एकदा वाचायचं नाही.' बरं मला पिक्चरचा शौक होता. पिक्चरला आम्ही जात असू. त्यांना इंग्लिश पिक्चर फार आवडायचे. आणि त्यावरची पुस्तकं वाचलेली असायची. सहा महिन्यांनी कधी तरी तेवढा पैसा खर्च करायला असायचा. फार कंटाळा आलाय. आज पिक्चरला जाऊ. अमूक पिक्चर म्हणून अमूक दिवशी जाऊन ते बाल्कनीची तिकिटं आणायचे आणि मग आम्हांला थाटाने न्यायचे. त्याच्यानंतर मंडळाची गाडी पण होती. तर तिनं पिक्चरला घेऊन जायचे. पिक्चरला जाताना महाग तिकिटं काढून चांगल्या जागांवर बसवायचं, बघून झाल्यानंतर जेवण चांगलं द्यायचं. १००-१५० रुपये खर्च करून घरी यायचं. पण मी काही म्हटलं आणि त्यांनी झटकन नाही म्हटलं असं नसे.'थांब हा. आपण आपल्याकडे पैसे आले ना की जाऊ' म्हणायचे. याकरता खर्च करायचा तो त्यांचा असायचा.

मी भरून पावले आहे : ५१