पान:मी भरून पावले आहे.pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाच रुपयांपेक्षा आपली ऐपत नाहीए पण ते पाच रुपये देखील मोठे असायचे. ते म्हणायचे ना, 'मेहरू आली होती. रुपया देऊन गेली. किती बरं वाटलं, ती बोलून गेली. माझं आता औषध येणार.' अशा रीतीची सवय जी मला ह्यांनी लावली ना, ती अजून आहे. मी तेव्हा पाच वाटत होते, आता पन्नास वाटू शकते. आणि मला त्याची जाणीव आहे. आपल्याकडे माणसं येतात, त्यांना आपण मदत केली पाहिजे.

 आमच्याकडे लेखकमंडळी यायची. कुरुंदकर यायचे. नरहर कुरुंदकर, यदुनाथ थत्ते, भाई वैद्य यायचे. मंडळाची स्थापना भाईंच्या घरीच केली. मराठा ऑफिसमधले लोकही यायचे. या सगळ्यांची नावं, ते मोठे लेखक असं मला फारसं माहीत नव्हतं. पण हे माझी ओळख करून द्यायचे. पहिल्यांदा हात धरून बाहेर आणायचे. त्यांची ओळख करून द्यायचे. बघ रे, ही माझी बायको. आता कुणाला जेवायला बोलवायचं असेल तर मला न विचारता त्यांना बोलवायचे नाहीत. घरात यायचे, मला मस्का लावायचे आणि म्हणायचे, 'मेहरू, माझ्या मनात आहे जरा काही लोकांना बोलवायचं. अमूक अमूक लोकांना बोलवायचं. काय करायचं? बोलवायचं का? बोलवू?' 'कधी बोलवायचं?' 'अमूक दिवशी बोलवू?' मग ते सांगायचे, ‘सगळे येणारेत.' 'मग मेनू काय करायचा?' 'मेहरू, माझा मेनू हा हा आहे. तुझा काय आहे? माझ्याकडे काय काम? मी कोंबडी आणून देईन.' मग ती शिजेपर्यंत ओट्यापासून बाजूला व्हायचे नाहीत. मी कशी शिजवते हे बघायचे. 'मेहरू, त्यात हळद जास्त नको हं. मीठ कमी घाल हां. याच्यात तिखट कमी घाल. याच्यात तेल एवढं घाल', असं सांगायचे. याच्यानंतर बशीत घेऊन खायचे, पाठ थोपटायचे आणि बाजूला व्हायचे. आणि मग पाहुणे आल्यानंतर सगळं बाहेर न्यायचं. सगळ्यांना परोसल्यानंतर मेहरू, चल तू पण इथे बसायचं. 'काय रे हे चांगलं झालंय ना, हे मेहरूनं केलंय.' असं खूप म्हणजे खूप कौतुक करायचे. मलाच असं वाटायचं की इतकं कशाला बोलतात! तिला खूप चांगलं येतं हे करायला. कसं झालंय? आणि सगळे बोलायचे, नाही नाही भाभी. तुम्ही खूप चांगलं केलं. सगळं उचलून ठेवायचे आणि नंतर ते गेल्यानंतर अक्षरशः पाय चेपायचे माझे. म्हणायचे, 'तुला आज किती ग त्रास झाला, ऑफिसमधून आली. तू करते सगळं मेहरू, मला जाणीव होते ग. पण मला असं वाटतं की लोकांना बोलवावं. तुला बरं वाटत नाही का?' म्हणजे ही जाणीव होत होती, की आपण हिला त्रास देतो आणि पाय चेपताना, 'कुणाला सांगू नको हं, की पाय चेपले म्हणून' असंही सांगायचे. अशा रीतीने खेळीमेळीचं वातावरण असायचं.

५० मी भरून पावले आहे