आणि मग जेव्हा आम्ही दोघी पुण्याला निघालो तेव्हा आईला जरा डाऊट आला की हा ट्रेनवर येतो की काय! ते ट्रेनवर आले होते पण त्यांनी लांबून बघितलं. हात केला. आणि मग मी ट्रेनमध्ये चढले. आईच्या हे लक्षात आलं. पण ते पुण्याला येणार, सगळ्यांना भेटणार ही काही कल्पना तिला आली नाही. दोन दिवस आम्ही राहिलो. त्या दोन दिवसांत असं ठरलं होतं वडिलांच्यासमोर की आई तिकडे जाईल, आजी-बिजी सगळ्यांना सांगेल, त्यांना विचारेल आणि येईल. तर आईने तिथे विषयच काढला नाही. ती मुंबईला निघून आली. आमचं ठरल्याप्रमाणे हे पुण्याला आले. पुण्याच्या जवळ ते मेट्रो हॉटेल आहे ना, तिकडे ते थांबले आणि त्यांनी फोन केला. फोन केल्यानंतर मी माझ्या आत्याला सांगितलं. आत्या प्रिन्सिपॉल होती ना, तिला सांगितलं की बघ हे असं असं आहे. आता पुढचं तू कर. माझ्या आईने तर काही सांगितलेलं नाही. तर ती म्हणाली तू काही काळजी करू नको. मालिनीबाईला आपण सांगू या काकीला माझ्या. आणि काकीला जाऊन सांगितलं. काकी म्हणाली, कशाला घाबरतेस? तुझ्या मनात आहे ना, करू या. आणि तिने लगेच हमीद आलेला आहे कळल्यावर दुसऱ्या दिवशी मीटिंग ठेवली. काकाला सांगितलं. काकाला सांगितल्यावर त्यांनी फार आढेवेढे घेतलेच नाहीत.
काकी म्हणाल्या, आपण भेटू या, बघू या. म्हणजे भेटलेले नव्हते ते. पण बाईंनी त्यांचं लेखन वाचलेलं होतं. वाचणं वेगळं अन् भेटणं वेगळं. त्यामुळे मग ही आत्या, आत्याचा डॉक्टर नवरा, दुसरी आत्या आणि हे दोघे असे घरात जमले. आम्ही यांना घरी बोलावलं. घरी बोलावल्यानंतर सर्वांनी मला सांगितलं, 'तू आतल्या खोलीत बसायचं. तू मध्ये बोलायचं नाही.' आणि बाहेर त्यांनी दलवाईंना विचारलं, काय आहे? तर त्यांनी सरळ सांगितलं, की मी हा असा असा आहे. मेहरूला मी सगळं सांगितलेलं आहे. आणि माझ्या मनात या मुलीशी लग्न करायचं आहे. घरच्यांना पण त्यांचा फ्रँकनेस आवडला. बरं, आम्ही जेव्हा पुण्याला आलो तेव्हा त्यांना रेल्वे मधला कॉल मिळाला होता आणि तो घेऊन ते माझ्या वडिलांच्याकडे गेले आणि म्हणाले की हे बघा मला नोकरीचा कॉल आलेला आहे. फक्त बरोड्याला आहे. वडील म्हणाले की तू जा. "तुम जाओ बरोडे को. जब तुम्हारा ट्रान्स्फर होगा बंबई को, तब देखेंगे.” तर यांनी सांगितलं की मग मला लिहून द्या तसं. ते म्हणाले, लिहून देणार नाही. मी सांगतो तेवढंच पुरेसं आहे. त्याच्यावर मग आम्ही ही युक्ती काढली आणि पुण्याला आलो. त्या वेळी पुण्याला येताना तो कॉल पण आणायला विसरले होते.