Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काकीनं पाहिलं तेव्हा तिनं मला बोलावलं आणि सांगितलं, “हात काढ तो खाली. हात का ठेवला? असं ठेवल्यामुळे जास्त प्रेम असतं असं वाटतं की काय? हे बरोबर नाहीये. हे हात असे गळ्यात घालायचे नाहीत आणि असं फिरायचं नाही. दोन वेण्या घालायच्या नाहीत. एकच वेणी घालायची. केसामध्ये फुलं घालायची नाहीत.” टीचर्सनासुद्धा सांगायची, “तुम्ही काही केलं तर तुमचे संस्कार मुलींवर होणार. त्यामुळे तुम्हीसुद्धा फॅशन करायची नाही. तुम्ही साध्या राहाल तर ह्या मुली साध्या राहणार.” तिचा अफाट दबदबा होता. शाळेमध्ये खानबाई आल्या म्हटलं की सगळे घाबरायचे. खूप शिस्तीच्या. आणि त्या स्वतः तशाच वागायच्या. मी एस्.एस्.सी.ला असताना त्यांनी माझ्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिलं. सहामाही परीक्षेमध्ये मी नापास झाले. त्यांनी घरी बोलावलं. दम दिला, लाडही केले आणि सांगितलं की तू अभ्यास केला पाहिजेस. मी फर्स्टक्लास नव्हते पण काकींना माहिती होतं की मी अभ्यास केला तर पास होणार, फेल होणार नाही. आमच्याकडे मॅट्रिकला पहिल्या वेळी कुणीच पास झालं नव्हतं. सगळे मॅट्रिकच्या आधी फर्स्ट क्लासमध्ये यायचे, पण मॅट्रिकला कुणी पहिल्या खेपेला पास झालं नाही. नवीन एस्.एस्.सी. निघाली त्या एस्.एस्.सी.ला मी बसले. काकी म्हणायच्या, “तू गरीब घराण्याची आहेस. तुला शिकलं पाहिजे. तुला नोकरी केली पाहिजे. तर तुला चांगला नवरा मिळेल. तुझं पुढचं आयुष्य चांगलं जायला पाहिजे. आपल्या लोकांमध्ये राहून तुला एवढं केलं पाहिजे.” त्यांनी आत्याला सांगितलं, गणित जरा हिचं थोडसं बघा. मग एक मास्तर यायचे, ते गणित शिकवायचे. जेव्हा परीक्षा झाली तेव्हा पेपर फुटले. पेपर फुटले आणि आम्हांला पत्ताच नाही. ते जे मास्तर होते, त्यांनी सगळे पेपर आणून, माझ्या मामे-बहिणीला देऊन सोडवून घेतले. आत्या मला म्हणाली, तिथं जायचं नाही. फुटलेले पेपर आपल्या घरात येता कामा नयेत आणि तुम्ही तशा त-हेने पास होता कामा नये. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये परीक्षेला गेले तर पहिला पेपर अकराला सुरू व्हायचा तो बारापर्यंत सुरू झाला नाही. काय झालं? तर सगळ्याजणी ग्राऊंडवर बसून पेपर सोडवत होत्या. माझ्याकडे पेपर नाही. काही नाही. मला तर वाटलं आपण फेल होणार. पण परीक्षा देऊन आले. परीक्षा झाली. पेपर वगैरे ठीक गेले आणि जेव्हा रिझल्ट निघायची पाळी आली, तेव्हा रात्रभर सगळ्यांचंच जागरण. आमची आजी आता म्हातारी होती बिचारी. तर ती म्हणायची, “काय करायचं, आता ही मुलगी पास होईल की नाही? तिचं काय होणार?" म्हणून तिला काळजी.

१० : मी भरून पावले आहे