पान:मी भरून पावले आहे.pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोकळं वातावरण होतं. आमच्या घरात धर्माचं सगळं व्हायचं. नेवैद्य दाखविणं व्हायचं. ईदला नमाज पढा म्हणून सगळे नमाज पढायचे. पण सगळेच्या सगळे पढायचे. त्यात मजा यायची खाण्यापिण्याची आणि ईद आली म्हणून कपड्यांची मजा व्हायची. काका मला वेगळे कपडे द्यायचे. आत्या मला वेगळे कपडे द्यायची. आई मला वेगळे द्यायची. मामांची लाडकी म्हणून तेही द्यायचे. चार-चार, पाच-पाच जोड मला ईदला यायचे आणि माझी इतकी मजा व्हायची. त्यामुळे मला ते सगळं मजेमध्ये करायला काहीच वाटायचं नाही, आणि मी करत असे.

 आमच्या घरामध्ये हिंदू-मुसलमान प्रश्न नव्हता, कारण ज्या कंपाउंडमध्ये आम्ही राहात होतो त्यात गरीब घरं जी होती ती सगळी हिंदूंची होती. म्हणजे धेड, महार, चांभार अशा लोकांची होती. ते सगळे आमच्या आजीकडे यायचे. आजी औषधं बांधून द्यायची, तिला माहिती असल्यामुळे, आणि ते लोकही जरा काही सणवार झाला, काही खायला केलं की आजीला द्यायला यायचे. आजीला त्यांच्याकडे दिवसभर बसलं तरी चालायचं. आम्ही त्यांचीच मोडकी-तोडकी भाषा बोलत होतो. आमची भाषा उर्दू आहे म्हणून खूप काही चांगली उर्दू बोलत नव्हतो. धेडगुजरी भाषाच आमच्या तोंडात होती. असं पण मानलं जायचं नाही की या लोकांत राहिल्यामुळे यांचे संस्कार खराब होणार, घाण होणार. तिथे राहिल्यामुळे आमच्यावर खराब संस्कार झाले नाहीत. आमच्याजवळ राहाणारे सगळे गरीबच होते. खालच्या जातीचेच होते. आमची काकी तर उच्चवर्णीयच होती. पण आम्हांला असा भेदभाव कधी कुणी केला नाही. खूप मोकळं वातावरण होतं. असं काही नव्हतं की हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा आदर करावा, हे गरीब आहेत म्हणून त्यांना कमी लेखावं, असं काही आमच्या घरात वातावरण नव्हतं. काकीच्या शाळेमध्ये मी शिकत असे. ती आम्हांला इंग्लिश शिकवीत असे. शेवटच्या वर्षाला ती यायची, इंग्लिश शिकवायची. तिची शिकवण्याची पद्धत इतकी चांगली असायची, “माझ्या तोंडाच्या आकारावरून" ती म्हणायची, “तुम्ही शब्दांचे - उच्चार करा म्हणजे स्पेलिंग मिस्टेक होणार नाही." आमची कधी स्पेलिंगची चूक खरंच झालेलीच नाही आणि प्रोनन्सिएशन चुकीचं कधी झालेलं नाही. इंग्लिश कसं बोलायचं? त्यांचं कसं, ती लंडनहून आलेली होती. ती भांडारकरांची नात होती. सगळी फॅमिली फार उच्च वातावरणातील होती. त्यामुळे तिच्यावरचे चांगले संस्कार ती मला देण्याचा प्रयत्न करीत होती. शाळेमध्ये असताना आम्हांला एक सवय होती, मैदानावर राउंड घ्यायला लागलो की मैत्रिणीच्या गळ्यात हात घालायचा.

मी भरून पावले आहे : ९