ऑफिसरांना विचारलं, इथं काय आहे? तर म्हणाले इथं मेहरुन्निसाबाईंचा प्रोग्रॅम आहे. त्यांना माहिती नाही मीच ती. मागच्या लिफ्टमधून मी वर चढले. कारण मला मागची लिफ्ट मराठा मंदिरचे संचालक गावडे यांनी दाखवली होती. ते म्हणाले की, बाई, येताना या लिफ्टने वर चढायचं. इथं कुणाला परमिशन नाही. ही माझ्यासाठी लिफ्ट आहे. तुला धोका आहे म्हणून पुढच्या दारातून तू कधी यायचं नाही. म्हणून मी तिथून गेले. केअर-टेकरला भेटले. ते म्हणाले, पुढच्या दारामध्ये खूप मुलं जमा झालेली आहेत आणि गोंधळ घालत आहेत. त्यामुळे तुम्ही या रूमच्या बाहेर निघू नका. तुम्ही आलेलं कोणाला माहिती नाही. म्हणून तर म्हटलं, मी दोन तास अगोदर आलेली आहे. 'सगळी व्यवस्था झालेली आहे. तुम्ही कसली काळजी करायची नाही', म्हणाले, पण एवढं आहे की तुम्ही ज्या दारातनं एंट्री करणार आहात, त्या दारावर आपली माणसं उभी करा. कसं कळणार, कोण कुठे घुसलाय म्हणून? या बुरखावाल्या बायका कोण आहेत? त्यांना अडवणार कोण? त्या सगळ्या आत आल्या. मी समजते, अहिल्याबाईंनी पाठवल्या म्हणून. पहिल्या रो मध्ये बसलेल्या. हॉल पॅक्ड. खाली बोंबाबोंब चालू आहे. आमच्या बायका आम्ही मागच्या दारातून आणून पुढे बसवल्या. का तर त्यांना पण तिथं जायला त्रास नको म्हणून. खाली पोलिसांचा पहारा उभा आहे. दोनएकशे पोलीस जमा. प्रत्येक प्रोग्रॅम तसाच व्हायचा तिकडे. दोन एक लोकं बोलले आणि मी बोलायला उभी राहिले. मी आपला पेपर वाचते. पेपर वाचायला लागल्याबरोबर धडाधड बायका उठल्या. 'नाही, काय बोलते ही. हिला बोलू देणारच नाही', असं म्हणाल्या म्हणे. त्या पुढे आल्या. धक्काबुक्की, अशी चलबिचल झाली सगळ्या सभेमध्ये. स्टेजवर चढले सगळे. मृणालताईंनी मला बाजूला बसवलं. म्हणाल्या, 'तू बैस.' त्यांनी धीर केला, बाहेर जाऊन लेडी-पोलीस बोलावली आणि त्या बायकांना बाहेर काढण्यात आलं. मृणालताईंना स्टेशनवर सोडायला सुद्धा इतकी माणसं गेली तर चपला फेकल्या त्यांच्यावर. त्यांनासुद्धा त्रास दिला. शहाबानू बाई घरी गेल्या. मग मी सगळं आटपलं. नंतर मागच्या लिफ्टमधून खाली उतरले. आमची गाडी भरलेली होती. गाडीत मला बसवलं आणि आम्ही घरी आलो. हे अनुभव प्रत्येक वेळी घेत होतो. साधी मीटिंग आमच्या दारात घ्यायची- आमच्या समोर एक हॉल आहे तिथं जर मीटिंग घ्यायची असेल तर पहिल्यांदा पोलिसांना कळवायचं. त्यांचं प्रोटेक्शन कॉलनीच्या बाहेर घ्यायचं. तेव्हा माणसं आत सोडायची, असं चाललं होतं.
पान:मी भरून पावले आहे.pdf/185
Appearance