Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असं वाटलं. मी समोर बसलेली, भाषणं झालेली. युक्रांदची काही मंडळी होती त्यांच्यात. हुसेन दलवाई आणि अरुण केळकर वगैरे होते. त्यांना भेटायला म्हणून मी मागच्या बाजूने स्टेजवर आले, तर सगळी माणसं उठून जायला लागलेली आणि स्टेजवर अरुणला खूप मारायला लागलेली लोकं. मी अशी उभी. कोणी बाकीचं दिसलं नाही मला. आणि मी वाचवा, वाचवा म्हणून ओरडले. सगळे बसून. मी हात धरून धरून बाजूला काढले त्यांना. शेवटी मी बाहेर गेले. पोलीस बसले होते. त्यांना घेऊन आत आले आणि त्या लोकांना धरायला लावलं. एवढं काम केलं मी. अरुण आत होता तिथंच मी उभी होते. तेवढ्यात महंमददाच्या लक्षात आलं काय झालं ते. आले आणि मला बाजूला घेऊन उभे झाले. म्हणाले, 'तुम्ही इथं उभं राहायचं नाही.' त्यांनी मला लपवलं. थोड्या वेळानं मी त्यांना म्हटलं, 'अरुणला खूप मारलं हो, मला जरा त्याला भेटू द्या.' तर अरुणने निरोप पाठवला २-३ माणसांबरोबर की भाभींना म्हणावं तुम्ही जितक्या लवकर इथून जाता येईल तितक्या लवकर निघून जा. थांबू नका. मी म्हटलं, 'मी जाणार नाही. अरुणला बाहेर काढा. माझ्याशी त्याला बोलू दे. त्याच्याशी बोलल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मी का जाईन? म्हटलं, त्यांनी मार खावा आणि मी घरी जाऊन बसावं हे मला पटणार नाही.' तो माझा पहिलाच प्रसंग होता मारबीर बघण्याचा. इतका मार बघायची ती पहिलीच वेळ होती. मग अरुण आला, भेटला आणि त्यानं सगळं समजावून सांगितलं. म्हटलं, 'आपण सगळे मिळून जाऊ. तू पण चल आमच्या बरोबर. मला काळजी वाटेल रे तू इथं राहिलास तर.' तर आम्ही सगळे चालत स्टेशनपर्यंत आलो.

 त्यानंतर ३ मेचा आणखी एक प्रोग्रॅम आम्ही घेतला. आम्ही तो मराठा मंदिरच्या हॉलमध्ये घेतला होता. त्या वेळी मृणालताई गोरे, प्रमिलाताई दंडवते वगैरे सगळ्या आल्या होत्या आणि ती शहाबानू केस झाली की नाही, त्या बाईचा सत्कार ठेवलेला होता. त्या वेळी अहिल्याबाई रांगणेकर मला म्हणाल्या, 'काही बायका पाठवेन मी कार्यक्रमाला. पण बुरख्यामध्ये असतील, चालतील नं तुला?' म्हटलं, ‘असू दे.' बुरखेवाल्या आल्या पण त्यांनी पाठवून दिलेल्या नव्हत्या. आम्हांला कळलंच नाही आणि गंमत बघा, ज्या दिवशी प्रोग्रॅम त्या दिवशी मी एकटी आले हॉलवर, दोन तास अगोदर. आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या बायकांना व्यवस्थित गाडीबिडी करून त्यांची व्यवस्था करा. बायकांनी मारबीर खाल्ला तर परत आपल्या बरोबर येणार नाहीत. म्हणून मी सगळी व्यवस्था केली. मी आले तिकडे. सगळा पोलिसांचा पहारा खूप. मग मी पोलीस

मी भरून पावले आहे : १६९