Jump to content

पान:मी निरोगी कसा राहीन.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मी निरोगी कसा राहीन ?

६५

बांधाव्या व त्यांवर चुन्याचा गिलावा करावा. भिंती फार जाड असूं नयेत. कारण, त्या सूर्याच्या उष्णतेनें दिवसा तापून गेल्यानें त्यांत उष्णता सांचते व थंड व्हायाला बराच वेळ जातो; त्यामुळे रात्रीचा त्रास होतो. म्हणून भिंती घराच्या आधाराला पुरेशा बळकट ठेऊन फार जाड असूं नयेत. पुष्कळ लोक जमिनी व भिंती शेणानें सार- वितात, हें बरें नाहीं. जर जमिनी आणि भिंती वर सांगितल्याप्रमाणें केलेल्या असल्या तर नुसत्या पाण्यानें धुतां येतात; पण जर सारविण्याची जरूरच पडली, तर स्वच्छ मातीचा उपयोग करावा. पण ती माती दूर अंतरावरची चांगली असावी. उकीरड्यावरची किंवा घाणेरडी असूं नये. घराच्या आजुबाजूस व लागून पाणी सांचू देऊ नये. असें पाणी एकदम वाहून जाण्याजोगे गटार असावें. घराच्या छपरास चांगला ढाळ द्यावा व पावसाचे पाणी गळू नये, अशा तऱ्हेनें कौलांनीं चांगले शाकारावें. कौलांच्या खाली पोकळ जागा न ठेवतां आंतून चांगलें छत केलेले असावें. नाहीं तर असल्या पोकळ जागेंत उंदीर, पक्षी, वगैरे निरनिराळे प्राणी घरटी करून राहूं शकतात, व त्यां- पासून पुढे उपद्रव होण्याचा बराच संभव असतो. वळचणीखालच्या भिंतीवरून अशा प्राण्यांचा शिरकाव होऊं नये ह्मणून तारेची जाळी बसविलेली असावी. घरांत ताजी शुद्ध हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठीं खिडक्या आणि दरवाजे मोठे असावेत. दरवाजे समोरासमोर असल्यानें मधुनमधून ताज्या हवेचा प्रवाह येण्यास बरें पडतें. प्रत्येक खोलींत खोलीच्या मानानें बाहेरच्या बाजूच्या खिडक्या असाव्यात. कित्येक खिडकी ठेऊन तिला कांच लावून ती बंद करून ठेवितात. अशा खिडकीतून आंत उजेड पडतो, पण हवा येत नाहीं. ही रीत फार चाईट आहे. खिडकी व तिच्यावर जाळी लाविलेली असावी, ह्मणजे