येथील आयुर्वेद विद्यालय व हिंदु हॉस्पिटलांत रेसिडेंट फिझिशियनच्या जागी असतांना व त्यानंतर स्वतंत्रपणे वैद्यकीचा धंदा करूं लागल्या- पासून आजतागायत पुष्कळ प्रकारचे रोगी माझ्या पहाण्यांत आले, त्यावरून आपल्या लोकांचें आरोग्य दिवसेंदिवस क्षीण होण्याला जीं कारणे दिसून आली, त्यांत आरोग्याचीं सामान्य तत्त्वें देखील माहित नसल्यामुळे पुष्कळांकडून तीं पाळली जात नाहीत, ही गोष्ट माझ्या विशेषेकरून अनुभवास आली. अशा या सामान्य मूलतत्त्वांच्या ज्ञानाभावीं लोकांच्या प्रकृतीचा होणारा न्हास व लहानसहान दुखणें देखील राईचा पर्वत होऊन होणारी प्राणहानि पाहिली ह्मणजे कोणाहि समंजस माणसाला खेद वाटल्याशिवाय रहाणार नाहीं. अशी स्थिति होऊं नये, लोकांना आरोग्याची तत्त्वें कळावीं, आणि तद्द्वारा आरोग्यरक्षणाचा मार्ग सुलभ व सुखपरिणामी व्हावा, या हेतूनें हें पुस्तक लिहिलें आहे. समजण्यास सुलभ पडावें ह्मणून आपला नित्यवर्तनक्रम घेऊन त्यांत आरोग्याचीं तत्त्वें गोंविलीं आहेत.
माझे स्नेही रा. रा. लक्ष्मणराव विनायक परळकर, बी. ए., एल्एल्. बी. यांनी या पुस्तकाच्या बाबतींत ज्या उपयुक्त सूचना केल्या, त्याबद्दल मी त्यांचा फारफार आभारी आहे.
अग्निमांद्य, रोगजंतु, क्षयरोग व त्यावर उपाय, अशक्तता, फिरंग- रोग, विद्यार्थ्यांचें आरोग्य या पुस्तकांप्रमाणेच हें पुस्तकहि लोकाश्रयास पात्र होईल, अशी उमेद बाळगून ही प्रस्तावना पुरी करितों.
ग. पां. काळोखे.
आनंद फार्मसी, चर्नीरोड, मुंबई, २५-९-१५.