पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दुसरी मर्यादा येते ती म्हणजे पुरुषाशी जोडले गेलेले गुणधर्म स्त्रीमध्येही दिसू शकतात व स्त्रीला जोडलेले गुणधर्म पुरुषामध्येही दिसू शकतात. उदा. १. 'भावनाप्रधान असणं' हा स्त्रीशी जोडलेला गुणधर्म असला तरी काही स्त्रिया फारशा भावनाप्रधान नसतात. तसंच पुरुषं भावनाप्रधान नसतात हे म्हणणं चुकीचं होईल.

 उदा.२. 'ताकद'. पुरुष जास्त ताकदवान असतो व स्त्री कमी ताकदवान असते, या धारणेतून हा पुरुषी गुणधर्म मानला जातो. पण काही स्त्रिया नैसर्गिकदृष्ट्या खूप ताकदवान असतात. तसंच काही पुरुषं नैसर्गिकदृष्ट्या नाजूक असतात. या उदाहरणांतून दिसतं, की एक- प्रत्येक स्त्री व प्रत्येक पुरुषामध्ये विविध गुणधर्माच्या विविध छटा असतात व दुसरी- काही 'पुरुषी' मानलेले गुण स्त्रियांमध्ये व 'बायकी' मानलेले गुण पुरुषात निसर्गतः असू शकतात.

 काही पुरुषांच्यात 'पुरुषी' मानल्या गेलेल्या सर्व गुणांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश दिसतो. उदा. खूप ताकदवान, खूप आक्रमक.. इत्यादी. तसंच काही स्त्रियांमध्ये 'बायकी' मानल्या गेलेल्या सर्व गुणांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश दिसतो. उदा. खूप नाजूक, खूप हळव्या, इत्यादी. हे गुणधर्म पुरुषाचा व स्त्रीचा 'स्टीरिओटाईप' बनतात.

 काही पुरुषांच्यात बायकी मानल्या गेलेल्या सर्व गुणांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश दिसतो. उदा. खूप नाजूक, खूप हळवा, पुरुषाबद्दल लैंगिक आकर्षण, स्वीकृत लैंगिक भूमिका घेण्याची इच्छा...इत्यादी.

लिंगभाव

 अगदी ढोबळ अर्थी सांगायचं झालं तर आपण जग मुख्यतः स्त्री म्हणून अनुभवतो का पुरुष म्हणून अनुभवतो तो आपला लिंगभाव असतो. जसं प्रत्येकाचं एक शारीरिक लिंग असतं, तसंच प्रत्येकाचं एक मानसिक लिंग असतं ('सायकॉलॉजिकल सेक्स'). आपल्या मानसिक घडणीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती स्वतःला स्त्री किंवा पुरुष समजू लागते. प्रत्येक गुणधर्माच्या अनेक छटा असल्यामुळे अनेकांचा लिंगभाव पूर्णपणे पुरुषाचा किंवा पूर्णपणे स्त्रीचा नसतो. अगदी ढोबळपणे लिंगभावाचे गट पाडायचे झाले तर ते असे पडतील-


मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

३३