पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लहान मुलं आपली जननेंद्रियंही खेळण्यासाठी वापरतात. प्रत्येक अवयवाला हात लावणं, ओढून बघणं, ताणून बघणं, शरीराच्या सगळ्या भोकांत बोटं घालणं, हा लहान मुला/मुलींचा वाढीचा एक भाग असतो. त्यामुळे कानात, नाकात, गुदात पेन्सीलसारख्या वस्तू घालणं, अशा अनेक गोष्टी पालकांच्या नजरेस येतात (अशा वस्तू लहान मुलांपासून दूर ठेवणं व मुलांवर लक्ष ठेवणं एवढी खबरदारी पालकांनी जरूर घ्यावी.) पालकांनी लैंगिक पैलू अनुभवला असल्यामुळे लहान मुलांच्या अनेक कृती पालकांना लैंगिक वर्तन वाटतात व पालकांचा गैरसमज होतो. ते घाबरून जातात. मुला/मुलीला शिक्षा करतात. पालकांना जाण असली पाहिजे की या कृतींमध्ये अजिबात लैंगिक भावना नसते.

कुतूहल

 लहान वयात मुला/मुलींना आपल्या व इतरांच्या शरीराबद्दल कुतूहल असतं. लहान मुलाचं व मुलीचं शरीर बाह्य अंगांनी कंबरेखाली वेगळं असतं. त्यामुळे मुलगी आपल्यापेक्षा कशी वेगळी हे जाणण्याची लहान मुलांमध्ये इच्छा असते. तसंच मुलगा आपल्यापेक्षा कसा वेगळा आहे याचं कुतूहल मुलींना असतं. अनेक जणांना लहानपणी डॉक्टर-डॉक्टर खेळलेलं आठवत असेल. मला स्वच्छ आठवतं, की मी आणि इतर मुलं-मुली डॉक्टर-डॉक्टर खेळलेलो आहोत. डॉक्टर बनून, तपासण्याचा बहाणा करून, मुलीने माझी चड्डी काढायची, मग मी डॉक्टर बनून तिची चिड्डी काढायची, हा खेळ खेळायचो. यात कुठेही लैंगिक भावना नव्हती. फक्त कुतूहल होतं.

सुखद भावना

 जननेंद्रियांच्या भागात जास्त संवेदशनशीलता असते. म्हणून जननेंद्रियांना हात लावून, चोळून, घासून लहान मुला/मुलींना सुख मिळतं. या सुखाचा लैंगिक सुखाशी काहीही संबंध नाही. वृषण, लिंग कुरवाळणं, जननेंद्रिय जमिनीवर घासणं, हे स्पर्श मुलांना आवडतात, म्हणून वारंवार तीच कृती करतात. पालक लगेच मुलाचा हात हिसकून घेतात किंवा धपाटा घालतात. “ई शी शी", "खाली हात लावलास तर मार मिळेल" किंवा "छी छी त्या जागेला हात लावायचा नाही" अशी प्रतिक्रिया देतात. अशाने मुलांना संदेश मिळतो की कंबरेखालचे अवयव वाईट आहेत, घाण आहेत, त्यांना स्पर्श करणं वाईट आहे. त्याच्यामुळे ते अवयव व त्या अवयवांशी निगडित कार्य वाईट आहे असा चुकीचा संदेश मुलांपर्यंत पोहोचतो. जननेंद्रियांशी चाळा होत असेल तर अशा वेळी त्या मुलाचा हात बाजूला घ्यावा व दुसऱ्या गोष्टींवर त्याचं लक्ष वेधून घ्यावं.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

१५