पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. आपल्या समाजात पूर्वीपासून अशा पुरुषांसाठी एक वेगळी व्यवस्था विकसित झाली, ती म्हणजे हिजडा समाज. या समाजाची एक वेगळा समूह म्हणून कशी स्थापना झाली, त्यांची घराणी, त्यांचे रीतिरिवाज, त्यांची स्वतंत्र भाषा कशी बनली व बदलत गेली, हे कळणं अवघड आहे. ज्यांना या समाजाचा भाग बनावसं वाटतं त्यांना या समाजाचा सदस्य बनावं लागतं. याला 'रित' घेणं म्हणतात. हिजडा समाजाचा सदस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावाने रित टाकता येते. रित टाकल्यावर ती व्यक्ती गुरू बनते व रित टाकलेला चेला बनतो. एकदा रित पडली की आयुष्यभर त्यातून सुटायला काहीही मार्ग नसतो. एका व्यक्तीचा एकावेळी एकच गुरू असतो. एक गुरू कितीही चेले करू शकतो. चेल्याच्या मिळकतीतील काही हिस्सा त्यानं मर्जीनं (काही वेळा अनिच्छेन) गुरूच्या उदरनिर्वाहासाठी देणं अपेक्षित असतं. चेल्याचं जर एखादया गुरूशी भांडण झालं तर 'नायका' समोर जाऊन दुसऱ्या गुरूच्या नावे रित 'पलटी' करता येते. त्याच्यासाठी पैसे पडतात. हिजडा समाजात रित घेऊन दोन गोष्टी साध्य होतात. पुरुषांनी साडी घालून राहणं-समाजाला मान्य नसल्यामुळे हा एकच मार्ग समोर उरतो, ज्यातून तो पुरुष स्त्री म्हणून जगू शकतो. दुसरी गोष्ट काही ट्रान्सजेंडर बायकी असतात, फारसे शिकलेले नसतात, आर्थिकदृष्ट्या खूप कमकुवत असतात. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून हिजड्यांबरोबर नाचून, मंगती' करून (ढोबळअर्थी-लोकांकडून पैसे मागणं) पैसे मिळवता येतात. या मार्गाने स्त्री म्हणून राहायची आतून येणारी गरज पूर्ण होते व पैसेही मिळतात. हिजडा समाजात आपल्यासारखे इतरजण भेटल्यामुळे समाजानं वाळीत टाकलेल्या ट्रान्सजेंडर्सना इथे आधार मिळतो. हिजडा समाजात गुरूंच्या वरती सर्वांत वरच्या टप्प्यात असतात ते 'नायक' (महागुरू किंवा न्यायाधीश असंम्हणता येईल). महाराष्ट्रात हिजड्यांची अनेक घराणी आहेत. प्रत्येक घराण्याचा एक नायक असतो. नायक हिजडा समाजावर नियंत्रण ठेवतात. जे हिजड़े नियम मोडतील अशांवर हे नायक दंड लावू शकतात, जमातीतून बहिष्कृत करू शकतात. ही नियमावली कोणी लिहून ठेवलेली नसते. प्रत्येक नायक आपल्यापरीनं (व लहरीनं) एखादया हिजड्यावर दंड लादू शकतो. समाजबाह्य कायदाव्यवस्था असल्यामुळे या समाजात काही हिजड्यांचं शोषण होऊ शकतं. हिजडा समाज हा मुस्लिम धर्माकडे झुकणारा असतो. प्रत्येक नायक हजला जाऊन आलेला असतो. त्यांच्या कार्यालयात ('दैयार') स्त्रीनं किंवा हिजड्यानं टिकली, कुंकू लावून गेलेलं चालत नाही. गुरू व चेल्यांच्या घरात मात्र विविध धर्माच्या प्रथा पाळलेल्या दिसतात. काही हिजडे इतर देवदेवतांची आराधना करतात. उदा. मुर्गी माता (गुजरातमधील बेथरामची देवी). - २३६ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख