पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरुषबीजं अंदाजे ३ ते ५ दिवस जिवंत राहतात. म्हणून अंदाजे ९ ते १९ या दिवसांत त्या स्त्रीची गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. इतर दिवशी गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. कुटुंब नियोजनाचं कोणतंही साधन न वापरता योनीमैथुनातून गर्भधारणा होणार नाही याची खात्री देता येईल असा महिन्यातला कोणताच दिवस नसतो. याला अनेक कारणं आहेत. एकतर आपण मासिक पाळीचं चक्र सरासरी २८ दिवसांचं धरतो. पण प्रत्येक स्त्रीची मासिक पाळी प्रत्येक महिन्यात थोडी पुढे-मागे होते. त्यामुळे वरती दिलेले आकड़े दर महिन्याला तेच राहतील असं नाही. दुसरी गोष्ट, जरी बहुतेक वेळा महिन्याला एकच बीज परिपक्व होत असलं तरी क्वचित वेळा एका स्त्रीबीजापाठोपाठ दुसरंही स्त्रीबीज परिपक्व होऊन स्त्रीबीजवाहिनीत येऊ शकतं. त्यामुळे योनीमैथुनातून पुरुषबीजाचं पहिल्या स्त्रीबीजाशी मीलन झालं नाही, तरी मागून येणाऱ्या स्त्रीबीजाला एखादं पुरुषबीज मिळून गर्भधारणा होऊ शकते. म्हणून असुरक्षित योनीमैथुनातून शंभर टक्के गर्भधारणा होणार नाही, असा पाळीचक्रात कोणताच दिवस नसतो. आपण हिंदी सिनेमात अनेक वेळा पाहिलं आहे, की एकदाच असुरक्षित संभोग करून हिरॉईनला गर्भधारणा होते. हे शक्य आहे का? ही शक्यता खूप कमी आहे पण ती शक्यता नाकारता येत नाही. कारण वर दिलेली माहिती सांगते की तो संभोग कुठल्या कालावधीत झाला आहे यावरून स्त्री गर्भार होण्याची कमी किंवा जास्त शक्यता असते. म्हणून जर मूल नको असेल तर गर्भनिरोधाचं साधन वापरणं अत्यावश्यक आहे. लहान वय व गर्भधारणा मुलगी नुकतीच वयात आल्यावर तिच्याबरोबर योनीमैथुन केल्यास तिच्या योनीला इजा होण्याची शक्यता असते. मुलगी लहान असल्यामुळे तिच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली नसते व तिला गर्भधारणेचं ओझं झेपणारं नसतं. म्हणून बाळंतपणात ती दगावण्याची शक्यता असते, मूल पडण्याची शक्यता असते, कमी वजनाचं मूल होण्याची शक्यता असते. लहान वयात संसाराची जबाबदारी पेलण्याची प्रगल्भता तिच्यात आलेली नसते. या सर्व कारणांसाठी अठरा वर्ष पूर्ण व्हायच्या आत मुलीचं लग्न लावू नये. एक्टोपीक गर्भधारणा बहुतेक वेळा फलित झालेलं बीज स्त्रीबीजवाहिनीतून सरकत येऊन गर्भाशयात रुजतं व तिथे ते बीज वाढू लागतं. क्वचित वेळा हे फलित झालेलं बीज स्त्रीबीजवाहिनीतच वाढायला लागतं. याच्यामुळे स्त्रीबीजवाहिनी फुगू लागते. १९० मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख