पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डिटॉक्स व पुनर्वसन व्यक्ती दारू/नशेमुळे हाताबाहेर गेली की घरची मंडळी व्यसनमुक्ती केंद्राचा विचार करतात. त्या व्यक्तीला काही महिने अशा केंद्रात भरती केलं जातं. ही केंद्र एक प्रकारची वसतिगृह आहेत जिथून काही महिने बाहेर जाता येत नाही. त्यामुळे दारू/नशा हाती लागायचा प्रश्न नसतो. पुरुष व स्त्रिया यांची स्वतंत्र वसतिगृहांमध्ये राहायची व्यवस्था केलेली असते. दारू/नशा मिळत नाही म्हणून व्यक्तीमध्ये 'विड्रॉल' लक्षणं दिसू लागतात. 'विड्रॉल' चा त्रास असह्य होऊन ती व्यक्ती स्वत:ला इजा करून घेऊ शकते. हा त्रास कमी व्हावा म्हणून डॉक्टर औषधं देऊन त्या व्यक्तीवर देखरेख ठेवतात. तिच्या शरीरातील नशा काढून टाकणं हा पहिला टप्पा असतो. याला 'डिटॉक्सिफिकेशन' म्हणतात. 'डिटॉक्स' झालं तरी महत्त्वाचे प्रश्न अजूनही शिल्लक असतात. कुपोषण, नैराश्य, यकृताला आलेली सूज इत्यादी. या सर्वांवर उपचार करावे लागतात. यासाठी औषधं, कॉन्सेलिंग व थेरपी यांचा आधार घ्यावा लागतो. ही आत्मपरीक्षण करण्याची सुवर्णसंधी असते. आपल्याला आयुष्यात काय मिळवायचंय? काय करायचंय? आजवर आपलं वर्तन कसं होतं? याच्यापुढे कुठला रस्ता निवडायचा? जसजसे दिवस जातात तसतसं कधी एकदा आपण सुटतो आणि घरी जातो असं होते. घरी परत आल्यावर जोडीदाराबरोबर संभोग करायची इच्छा तीव्र असते, पण गेल्या काही वर्षांच्या आपल्या वागणुकीमुळे जोडीदाराचे काय हाल झालेत याची अनेकांना जाणीव नसते. काहीजणांच्या घरी अशी परिस्थिती असते की ती व्यक्ती परत कधीही आली नाही तरी चालणार आहे अशा स्थितीत जोडीदार असते. म्हणून व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीने नात्याचे तुटलेले धागे बांधायचा प्रयास करायचा असतो. तसं न करता फक्त लैंगिक सुखावर डोळा ठेवून नातं प्रस्थापित केलं तर लवकरच दोघांमध्ये परत दुरावा निर्माण होतो. मग परत भांडणं, हिंसा, अहंकार दुखावला जाणं आणि मग परत बाटलीचा आधार (रिलॅप्स)....

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख १८७