पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्तनाचा कर्करोग

 स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं तर औषधं व शस्त्रक्रियेने त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला जातो. शस्त्रक्रियेचे दोन मुख्य प्रकार आहेत. स्तनातील कर्करोगाची गाठ काढून टाकणं ('लंपेक्टोमी') किंवा पूर्ण स्तन काढून टाकणं ('मॅस्टेक्टोमी'). एक स्तन काढल्यामुळे त्याचं वजन जातं व शरीराच्या स्नायूंवर एका स्तनाच्या असंतुलनामुळे ताण पडून पाठ दुखू शकते. म्हणून मग काहीजणी कृत्रिम स्तन बसवतात.

 स्तनाचे काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग आहेत, ज्यांच्या वाढीस 'इस्ट्रोजन' संप्रेरक भर घालतात. अशा वेळी 'अँटी-इस्ट्रोजन' औषधं घेऊन शरीरातील 'इस्ट्रोजन' संप्रेरक कमी करून या कर्करोगावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. शरीरातील 'इस्ट्रोजन' संप्रेरक कमी झाल्यामुळे स्त्रीच्या मासिक पाळीचं चक्र बिघडू शकतं.

गर्भाशयाचा कर्करोग

 काही स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग होतो. गर्भाशयमुखाचा कर्करोग हा संभोग करणाऱ्या (सेक्शुअली अॅक्टिव्ह) स्त्रियांमध्ये जास्त आढळतो. गर्भाशयाचा कर्करोग आढळला तर बहुतेक वेळा डॉक्टर गर्भाशय काढून टाकायचा सल्ला देतात. गर्भाशय काढून टाकण्याला 'हिस्टरेक्टोमी' म्हणतात. जर गर्भाशयाबरोबर स्त्रीबीजवाहिन्या व स्त्रीबीजांड हे सर्व काढलं तर त्याला 'बाय-लॅटरल सॅल्पीजियो उफरेक्टोमी' म्हणतात. जर स्त्रीबीजांड शस्त्रक्रियेतून काढण्यात आली तर त्या स्त्रीला लगेच रजोनिवृत्ती येते.

  अनघा घोष म्हणाल्या, “कर्करोगामुळे माझी बीजांड, स्त्रीबीजवाहिन्या व गर्भाशय काढलं गेलं. तेव्हा मी स्त्रीत्व गमावते आहे असं मला थोडा वेळ वाटलं. पण मी असा विचार केला की एकतर ही शस्त्रक्रिया आवडो किंवा ना आवडो ती करावी लागणार होती. मला याच्यापुढे मुलं नको होती म्हणून मला पुढे मुलं कशी होणार ही काळजी नव्हती. स्त्रीबीजांड काढल्यावर मला रजोनिवृत्ती लगेच येणार याची जाण होती. त्यामुळे तशी काही प्रमाणात मानसिक तयारी होती. शस्त्रक्रियेनंतर मला लगेच रजोनिवृत्तीचा त्रास सुरू झाला. एकदम अंग खूप गरम व्हायचं व खूप घाम यायचा. माझी लैंगिक इच्छाही जवळपास नाहीशी झाली. अर्थात याला इतरही कारणं होती. माझी औषधं, 'केमो' चालू होती. त्याने खूप थकवा यायचा.

नाती

 आपल्या स्त्रीत्वाशी किंवा पुरुषत्वाशी निगडित असलेला अवयव शस्त्रक्रियेमुळे काढला गेला तर त्याचा आपल्या स्व-प्रतिमेवर परिणाम होतो. माझी आई

१५६

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख