पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याचा लैंगिक आयुष्यावर विपरीत परिणाम झाला तर नवल नाही. म्हणून औषधोपचारांबरोबरच कुष्ठरोगी व्यक्तीचा समाजात स्वीकार होणं, त्यांनी स्वावलंबी होणं तितकचं महत्त्वाचं आहे. कुष्ठरोगी व्यक्तींना समाजाने स्वीकारलं नाही, तर मग भीक मागण्यापलीकडे किंवा कुष्ठरोग वसाहतीत राहण्यापलीकडे काय पर्याय उरतो? 'दिनू मेहता को-ऑपरेटिव्ह सोसायटी' चे चेअरमन प्रशांत पाटील म्हणाले, “आज भारतात ८०० हून जास्त कुष्ठरोग कॉलनीज् आहेत. काय चित्र दिसतं? बहुतेकजण दारू विकणं नाहीतर भीक मागणं एवढंच करतात. हे असल्या त-हेचं जिणं डॉक्टर जाल मेहता यांना मान्य नव्हतं. समाजात सगळ्यांनी स्थान मिळवलं पाहिजे, कोणाची भीक नको अशी त्यांची धारणा होती. त्यांच्यामुळे ही सोसायटी उभी राहिली. आम्ही गाड्यांचे पार्ट्स बनवतो. इथे ११० कामगार आहेत व ९०% कामगार कुष्ठरोगातून बरे झालेले आहेत. अथक परिश्रमानंतर आता घरं झाली, अनेकांची लग्न झाली. माझ्या मुलाचं लग्न ठरवताना मी स्पष्ट सांगायचो की मला कुष्ठरोग झालेला होता. आता तुमची मुलगी माझ्या घरात यायची असेल तर दया नाहीतर नका देऊ. अनेक कामगारांच्या घरचे लोक आता स्थैर्य बघून स्वतःहून जवळीक साधायला लागले आहेत. आज आमच्याकडे एक कर्तबगार माणूस म्हणून बघितलं जातं. कुष्ठरोगी म्हणून बघितलं जात नाही. हेच आमचं खर यश आहे. पण एक नक्की, हे होण्यासाठी एक चांगला, प्रामाणिक व हुशार गाईड हवा. तो नसेल तर सगळं व्यर्थ आहे."

१२४

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख