पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काहीही महत्त्व नाही. एक अधिकारी तर असं म्हणाले, की “छे, छे, ते बिचारे कसेबसे आयुष्य काढतात हेच पुष्कळ आहे. त्यांना या असल्या गोष्टीत अजिबात रस नसतो."

 सर्वांना लैंगिक इच्छा असतात, पण विकलांग व्यक्तीचं असं कळत नकळत 'कंडिशनिंग' केलं जातं, की त्यांना लैंगिक इच्छा असणं अपेक्षित नाही किंवा त्या इच्छा असणं चुकीचं आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या मनात लैंगिक इच्छा आल्या की त्यांना अपराधी वाटतं. त्या व्यक्त करायला लाज वाटते. अशा परिस्थितीत आपल्या मनात लैंगिक भावना येतात म्हणजे आपलं काहीतरी चुकतयं अशी धारणा बनते. अनघा म्हणाल्या, “मी जेव्हा अपंग महिलांशी त्यांच्या लैंगिक गरजांबद्दल बोलते तेव्हा लक्षात येतं की समाजानं त्यांचं इतकं 'कंडिशनिंग' केलं आहे की त्यांचा पहिला उद्गार ‘छे काहीतरी काय? अशा इच्छा असणं बरोबर आहे का?' असाच असतो. हळूहळू मोकळेपणाने बोलायला लागल्यावर त्या मान्य करतात की, मी या इच्छा दाबून टाकल्या होत्या कारण त्या चुकीच्या आहेत असं वाटत होतं."

 समाजाच्या अशा दूषित दृष्टीमुळे अपंग जोडप्यांवर विविध प्रकारचा अन्याय होतो. घरच्यांची ही अशा जोडप्यांकडे बघायची दृष्टी अन्यायकारक बनते. उदा. जर लग्नानंतर स्त्रीला अपंगत्व आलं तर नवऱ्याला त्याचे नातेवाईक बायकोला सोडून देण्याचा सल्ला देतात.

 अपंग/व्हिलचेअरवर असलेल्या व्यक्तीला व त्याच्या जोडीदाराला एकांताची जरूर नाही असं गृहीत धरलं जातं. त्यांच्या खोलीत सासू किंवा सासऱ्यांनी पथारी पसरून झोपणं या जोडप्याला सुचवत असतं, की 'तुमचं आता सगळं संपलंय'. जिथे लैंगिकेतच्या कोणत्याच गोष्टी आपल्या इथे मोकळेपणाने बोलल्या जात नाहीत तिथे 'लैंगिक सुखाची आम्हांलाही गरज आहे, तर तुम्ही बाहेरच्या खोलीत झोपा', असं घरच्यांना सांगणं अवघड होतं (पण तरी ते सांगितलं पाहिजे).

 एकांत मिळाला तर संभोगाच्या वेळी अपंग व्यक्तीला 'पोझिशन' घेताना अडचण येऊ शकते. काहींच्या बाबतीत 'मिशनरी पोझिशन' (स्त्री खाली व पुरुष वरती) घेऊन संभोग करणं अवघड होतं. काहींना पुरुष खाली व स्त्री वरती ही 'पोझिशन' घेता येते. तर काहींना उभं राहून संभोग करणं सोयीचं पडतं.

 जर एकजण व्हिलचेअरवर असेल, तर 'पोझिशन' घेताना जोडीदारावर आपला भार पडून त्रास, वेदना होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

 माझा एक क्लायंट खुर्चीवर बसून त्याचा कृत्रिम पायाचा पट्टा नीट बसवत म्हणाला, "जेव्हा माझा अपघात झाला तेव्हा दोन महिने मी वेदनेतच होतो. लैंगिक

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

१२१