पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डोक्यावरचं कर्ज हटायची शक्यता नाही; उलट साखर कारखाने जितके वाढतील तितकं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज वाढतं आहे आणि त्याचं कारण, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळता कामा नये हे सरकारचं अधिकृत धोरण आहे. हे त्यावेळी कोणाला पटत नव्हतं. हे टनाटनाचे पुढारी काय करायचे? सगळ्या शेतकऱ्यांना सहकाराच्या नावाखाली दावणीला बांधायचे आणि मुंबई, दिल्लीच्या दरबारात जाऊन सांगायचे, 'शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला नाही, त्याच्या बापाला लुटलं, आजोबाला लुटलं तरी हे इतके शेतकरी माझ्या हाती आहेत. मला तुम्ही काय देता, बोला.' पुढाऱ्यांचा हा खेळ पंचवीसतीस वर्षांपूर्वीपासूनच चालू आहे, हा काही आजचा नवा खेळ नाही आणि या भागातले लोक मानायला तयार नव्हते तरी पंचवीस वर्षांपूर्वी पुढाऱ्यांचा हा डाव मी उघड करून सांगितला.
 आज सर्वसामान्यांच्यासुद्धा लक्षात येणाऱ्या सरकारच्या दुरवस्थेबद्दल मी दहाबारा वर्षांपूर्वी लेख लिहिले आहेत. मी त्यात म्हटले आहे की शेतकऱ्यांचं शोषण करणारं सरकार कधी जगू शकत नाही. असं सरकार कधी ना कधी कोसळणारच; फक्त नेमकी वेळ कधी येणार त्याची वाट पाहणेच आपल्या हाती राहते. सरकार कोसळायला लागले म्हणजे काय काय होईल याची यादीच मी त्यावेळच्या लिखाणात दिली आहे. गावातल्या वाण्याचं दिवाळं निघालं म्हणजे त्याच्या दुकानाची फळी बंद होते. फळी बंद म्हणजे दुकान बंद. मुंबईचं मंत्रालय असं फळी बंद करून बंद होत नाही. ते महाचिवट, चिकटून राहातं. सरकार कोसळत आहे हे ओळखायची लक्षणं मी माझ्या लिखाणात मांडली आहेत. सबंध देशामध्ये आगगाडीचे अपघात दररोज व्हायला लागतील, रस्त्यावर टेंपो, ट्रक्स, बसेस समोरासमोर धडकायला लागतील, एकेका अपघातामध्ये पाचदहा नाही, शंभरदोनशेने माणसं मरायला लागतील, घरामध्ये वीज असायला पाहिजे हे खरे असले तरी वीज कधीतरी येईल, आगगाड्या वेळेवर यायच्या नाहीत, कधी वेळेवर आल्यासारखी वाटले तर समजावे की ही आज नव्हे, दोन दिवसांपूर्वी येणारी गाडी आहे. सरकार कोसळू लागले की असा सगळा कारभार होऊ लागतो.
 आज आपलं काम हे सगळं काय आणि का होतं आहे हे शांत डोक्यानं समजून घ्यायचं आहे. काही दिवसांपूर्वी कोणी उसासंबंधी मुंबईला एक बैठक घेतली, पुण्याला एक बैठक घेतली आणि त्यानंतर उसाच्या परिस्थितीबाबत जी निदानं आणि उपाय सांगितले ते पाहिले की उसातल्या या तथाकथित दादा लोकांना जागतिक व्यापार संस्था म्हणजे काय हे कळलेलंसुद्धा नाही, WTO म्हणजे काय हे वाचण्याचीसुद्धा ज्यांना अक्कल नाही ते WTO संबंधी बोलू

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १९२