पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माल स्वस्तात आयात होत असला आणि ग्रहकाला तो स्वस्तात मिळणार असेल तर शेतकऱ्यांनी त्याला विरोध करणे चूकच होणार आहे. कारण, शेतकऱ्याला ग्रहकांवर अन्याय करण्याचा अधिकार नाही. 'ग्रहक नाडला गेला तरी चालेल पण आमचा फायदा झाला पाहिजे' असं म्हणणाऱ्या कारखानदारांप्रमाणे शेतकरी काही दुष्ट नाही. ग्रहकांना आम्ही विनंती करू की गेली पन्नास वर्षे आम्ही तुमच्यासाठी सहन केलं, आता फक्त पाच वर्षे आम्हाला संधी द्या आणि पाहा आम्ही काय चमत्कार करून दाखवतो ते!
 तेव्हा शेतकरी संघटनेचा 'शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी कार्यक्रम' यात काही फरक नाही. कोणासमोर तोंड वेंगाडणार नाही, कोणासमोर भीक मागणार नाही, कोणाकडे सब्सिडी मागणार नाही; पण संधी मिळाली म्हणजे भारतातील शेतकरी इतर राष्ट्रांतील शेतकऱ्यांपेक्षा काही कमी नाही हे सिद्ध करून दाखवील, भले त्याच्याकडे आधुनिक हत्यारे नसतील, आधुनिक तंत्रज्ञान नसेल. आमच्याकडे काही कमी असेल तर तो कमीपणा लपवून ठेवणार नाही; जे काही आमच्याकडे नाही ते आम्ही दुसऱ्यांकडून शिकून घेऊ. इंग्रज जेव्हा आले तेव्हा जोतिबा फुल्यांनी म्हटले होते की त्यांच्या येण्यामुळे या देशातील सर्व जातिजमातींच्या मुलांना शिकण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. आज भारतीय शेतकऱ्यांची मागणीही तशीच आहे. आपल्या देशातील जे कोणी विद्वान आहेत, शास्त्रज्ञ आहेत ते भाकड झाले आहेत. ते काही स्वतंत्र संशोधन करीत नाहीत. जे काही संशोधन होतं ते तिकडं परदेशात होतं - मग ते संशोधन औषधाचं असो, बियाण्यांचं असो का काँप्युटरचं. आमच्या देशातले शास्त्रज्ञ फक्त झारीतील शुक्राचार्याप्रमाणे हे संशोधन आम रयतेपर्यंत पोहोचू नये म्हणून अडवून धरतात आणि अगदीच नाईलाज झाला म्हणजे त्या संशोधनाची 'इंडियन' नक्कल भारतीय रयतेच्या माथी मारतात. आमची मागणी अशी आहे की दरवाजे उघडा आणि मूळ अस्सल संशोधनाशी, तंत्रज्ञानाशी आम्हाला संपर्क साधू द्या.
 नव्या बियाण्यांचे शास्त्र
 बियाण्यांच्या शास्त्रामध्ये एक क्रांती घडत आहे. बियाण्यांच्या या नवीन शास्त्राबद्दल ज्यांचा काहीही अभ्यास नाही अशी माणसं या बियाण्यांबाबतही मोठा ओरडा करीत आहेत. या बियाण्यांचे भाव भयंकर आहेत, या बियाण्यांबरोबर काय रोगराई येईल सांगता येत नाही, मागे जसं काँग्रेस गवत आलं तसं याबरोबर काय येईल सांगता येत नाही असं म्हणत या नवीन बियाण्यांबद्दल ही मंडळी मोठा बागुलबुवा उभा करीत आहेत. पण बियाण्यांचं हे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १६३