पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विजेचा भाव १ रुपया आहे म्हणता, परदेशातल्यासारखी वीज आम्हाला इथे शेतात मिळाली तर मीसुद्धा १ रुपया द्यायला तयार आहे." मी परदेशात पंधरा वर्षे राहत होतो त्या काळात फक्त दोनदा वीज गेली असं झालं. त्यावेळीसुद्धा आठ दिवस आधी वीजबोर्डाचं कार्ड आलं होतं, की अमुक दिवशी अमुक वेळेला आम्ही वीज घालवणार आहोत तेव्हा काही महत्त्वाची कामे असतील तर आधी आटोपून घ्या आणि विजेवर चालणारी जी काही यंत्रं असतील त्यांचं संरक्षण करण्याची व्यवस्था करा.
 आमच्या आंबेठाणला जी वीज येते तिची अवस्था काय आहे? एकही दिवस असा जात नाही की ज्या दिवशी तीनवेळा वीज तुटत नाही. विजेचा दाब कमीजास्त होणे तर सतत चालूच असते. कॉम्प्युटर चालवणे तर कठीणच पण विहिरीवरची मोटारसुद्धा अखंडपणे चालवणे शक्य होत नाही.
 मी वित्तमंत्र्यांना म्हटलं की, "परदेशातल्यासारखी वीज द्या, चोवीस तास द्या, ठराविक दाबाची द्या मी परदेशातला भाव तुम्हाला द्यायला तयार आहे;" पण सध्याच्या विजेकरता जर का तुम्ही जास्त भाव द्या म्हणालात तर आम्ही देणार नाही. आतासुद्धा विजेवर शेतकऱ्यांना सबसिडी नाही.
 शेतकऱ्याला सबसिडी किती दिली जाते? शेतकऱ्यांना सरकार देत असलेली सबसिडी किती दिली जाते? शेतकऱ्यांना सरकार देत असलेली सबसिडी उणे पन्नास टक्के आहे. म्हणजे शंभर रुपये जर तुम्हाला मिळायला पाहिजे असतील तर तुम्हाला फक्त पन्नासच रुपये मिळावे अशी व्यवस्था या सरकारने केली आहे आणि पन्नास रुपये जर कारखानदारांना मिळायला पाहिजे असतील तर त्यात शंभर रुपये मिळतील अशीही सरकारने व्यवस्था केली आहे. आता नेहरूव्यवस्था संपली, समाजवादी व्यवस्था रशियातही संपली. आता आपली घोषणा पाहिजे, आता यापुढे आम्ही गुलाम नाही, आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्हाला दुसरं काही नको.
 आज आपण हलरचं उद्घाटन करून सत्याग्रहाचा कार्यक्रम केला याचा अर्थ काय? हा हलर चालू करून कोणी कोट्यधीश होणार आहे काय? दाऊद इब्राहीमसारख्यानं स्मगलिंगचा धंदा चालू केला तर तो कोट्यवधी रुपये कमावतो. हा हलरचा धंदा चालवून सगळा खर्च-वेच वजा जाता पंधरावीस रुपयेसुद्धा दिवसाकाठी जमा होणार नाहीत. तरीसुद्धा हा हलर शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचं प्रतिक आहे. महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांनी सगळे कायदे बाजूला टाकून आपल्या मालाची प्रक्रिया करण्याचं स्वातंत्र्य स्वतःकडे घेतलं त्याचं हे प्रतिक आहे. आज उद्घाटन म्हणून आपण सत्याग्रह केला आहे, त्या हलरचं संरक्षण

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १०४