पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करतो की गणवेश ही सन्मानाची गोष्ट आहे, तुम्ही भाग्यवान म्हणून हा गणवेश घालण्याचा मान तुम्हाला मिळाला, गणवेश घालून चोरदरोडेखोरांचं पाप तुम्ही करू नका आणि तुमचे जे भाऊ गणवेश घालून शेतकऱ्यांवर अशा तऱ्हेने दरोडे घालत असतील त्यांनासुद्धा समजावून सांगा की या गणवेशाचा असा अपमान करू नका. गणवेश घालून जर कोणी चोरी करायला गेला तर त्याला पोलिस म्हणत नाहीत. गणवेश घालून चोरी करायला गेलेला माणसाला गणवेशातला चोर म्हणतात. गणवेशातील चोर जर सापडला तर त्यांचा बंदोबस्त, चोराचा जसा बंदोबस्त केला जाईल, तसाच केला जाईल. कायद्याने मला काही हक्क दिले आहेत. कोणी चोराने, दरोडेखोराने जर माझ्यावर हल्ला केला तर मी माझं संरक्षण करण्याकरिता काय केलं पाहिजे हे मला कायद्याने सांगितलं आहे. तो चोर गणवेश घालून आला तर मी माझं स्वत:चं संरक्षण करू नये असं कायद्यानं सांगितलेलं नाही. एखाद्या बाईवर जर का एखादा गणवेशातला पोलिस हात उचलू लागला तर बाईला स्वतःच्या अब्रूचं रक्षण करण्याकरिता काय वाटेल ते करण्याचा हक्क कायद्याने दिलेला आहे. तेव्हा पोलिसांनी एवढं लक्षात ठेवावं की तुम्ही भाऊ आहात आमचे, गणवेशातले भाऊ आहात, आम्हाला तुमच्याविषयी अत्यंत आदर आहे, केवळ सरकार दरोडेखोरांचं झालं आहे. मुख्यमंत्री गुंडांचा झाला आहे म्हणून तुम्ही तुमच्या गणवेशाचा अपमान होऊ देऊ नका. कारण या देशामध्ये शेवटी विजय होणार आहे तो या देशाच्या मालकांचा होणार आहे. गुंडांचा आणि दरोडेखोरांचा नाही.
 कापूस आम्ही पिकवलेला, शेजारच्या राज्यामध्ये सोळाशे भाव असला आणि इथं जर सरकार म्हणू लागलं की तुम्हाला फक्त हजार रुपयेच भाव मिळेल तर काय करायला पाहिजे? शेजारच्या राज्यामध्ये पोलिसांना जो पगार मिळतो, निदान तितका आपल्याला मिळाला पाहिजे अशी पोलिसांची जशी इच्छा, तसंच शेजारच्याच राज्यांतला भाव कमीत कमी आपल्याला मिळावा अशी कापूस उत्पादकांची इच्छा आहे. शेजारच्या कारखान्याच्या हद्दीतल्या उसाला जितका भाव मिळतो किमान तितका माझ्या उसालाही मिळावा अशी ऊसउत्पादकांची इच्छा आहे. तेव्हा सरकार शेतकऱ्याला जेव्हा अशा परिस्थितीत अडवत तेव्हा त्यांनी दिलेला हुकूम हा बेकायदेशीर आहे.
 तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या अधिकाऱ्याचं किंवा मॅजिस्ट्रेटचं काय घेऊन बसलात, खुद्द केंद्रशासनाच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे की भाताचा हलर काढण्यावर निर्बंध घालणारा कायदा मूर्खपणाचा आहे. तेव्हा पोलिसांनी शेतकऱ्यांवरील अशा तऱ्हेच्या निर्बंधाकरिता स्वतःचे हात उचलू नयेत, काठ्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १०२