पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्रेय या प्रश्नी दिवसरात्र एक करणारे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनाच द्यावं लागतं.
 अशीच आणखी एक प्रशासकीय क्रांती त्यांनी केली. सोनोग्राफी ट्रैकिंग सिस्टीम त्यांनी रॉकेलचे वितरण करणा-या बँकरसाठीही विकसित केली. त्यामुळे रॉकेल, पेट्रोल, डिझेल यांची वाहतूक, भेसळ, इत्यादींस मोठा प्रतिबंध निर्माण झाला. 'गोकुळ'सारख्या संस्थांनी हा प्रयोग दूध वाहतुकीसाठी केला तर ते उपकारक ठरेल.
 त्यांनी जिल्ह्यात ‘ई-चावडी'चा केलेला यशस्वी प्रयोग... त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने सन २०१२ चा ‘सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार' देऊन महाराष्ट्र शासनाने नागपूर अधिवेशनात त्यांचा गौरव केला. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तलाठ्यास संगणक प्रशिक्षण दिले. प्रत्येकास लॅपटॉप दिला. जिल्ह्याचे सगळे सात बारा, डायरी, उतारे, डाटाबेस पद्धतीने संग्रहित केले. जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर कोणासही जमिनीचा सातबारा मिळण्याची सोय करून भ्रष्टाचार व लाचलुचपतीचे मूळच त्यांनी उखडून टाकले. कोल्हापुरातील कोणताही उतारा कोणासही मिळण्याची किमया ही महसूल विभागाच्या साचेबंद प्रशासनास छेद देणारी घटना ठरली. संगणक साक्षरतेत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात मोठी आघाडी घेतली. त्याचे शिल्पकार म्हणजे लक्ष्मीकांत देशमुख!

 या नि अशा कितीतरी छोट्यामोठ्या प्रयत्नांतून लक्ष्मीकांत देशमुख यांनी सन २00९-२०१२ या तीन वर्षांच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांना पालकमंत्री, मुख्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्वांत म्हणजे सर्वसाधारण जनतेचं जे समर्थन, बळ लाभलं त्यामुळे ते हे परिवर्तन करू शकले. त्यांच्या कार्याची पोहोच पावती कोल्हापूरकरांनी त्यांना जाहीर सत्कार समारंभ करून दिली. असा सन्मान लाभलेले लक्ष्मीकांत देशमुख हे अपवादात्मक जिल्हाधिकारी होते. कोल्हापूरची कलेक्टरी' त्यांच्या साहित्यिकांनी शब्दबद्ध केली तर प्रशासकीय कारकिर्दीचा तो एक विधायक दस्तऐवज ठरेल. तो त्यांनी आवर्जून लिहावा, असे आवाहन व विनंती. त्यांच्या भविष्यास शुभेच्छा!

माझे सांगाती/६२