पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[९१


मी रंगविली आहे. हें नाटक सर्वस्वी हास्यरसोत्पादक आहे. पण कृष्णार्जुनयुद्ध नाटक व हें नाटक यांतील विनोदांत अेक मोठा फरक आहे. तो असा की, कृष्णार्जुनयुद्ध नाटकांतील विनोद सर्वस्वी माझ्या मनासारखा, माझ्या अभिरुचीसारखा, म्हणजे केवळ परिस्थितींतून आपोआप निर्माण होणारा आहे. त्यांत अतिशयोक्ति नाही व कृत्रिमपणाहि नाही. पण वीरविडंबन नाटकांतील विनोद बराचसा कृत्रिम आहे. म्हणजे तो साधण्याकरिता अतिशयोक्ति व कृत्रिमपणा यांचा बराच अुपयोग करावा लागला आहे.
 (७८) १९१८ सालीं विलायतेस जाण्याकरिता टिळकांबरोबर कोलंबो येथे गेलों. पण आयत्या वेळीं पासपोर्ट रद्द झाल्याने परत आलों. अुलट अिकडे मी विलायतेस जाणार म्हणून खाडिलकर यांचें नांव केसरीवर घालण्यांत आलें होतें. यामुळे मला केसरींत लिहिण्याच्या बाबतींत थोडी विश्रांति सहजच मिळाली होती. त्या अवधींत म्हणजे फिरून १९१९ सालीं विलायतेला जाण्यास निघण्यापूर्वीं मीं वीरविडंबन नाटक लिहिलें. पण तें प्रत्यक्ष लिहिण्याला मला फार वेळ लागला नाही; व तें किती सहजासहजी हातून लिहून झालें हें त्या नाटकाची मूळची हस्तलिखित प्रत मजजवळ आहे त्यावरून पाहिलें म्हणजे लक्षांत येतें. पदें देखील कांही कांही तालीम चालू असतां, व पदांच्या चाली कानाने अैकत असतां, जागच्याजागीं करून दिलीं आहेत. याचें कारण नाटक ताबडतोब रंगभूमीवर आणण्याची नाटक मंडळीची जरूरी. नाटकाचा प्रयोग एकंदरीने चांगला होअी. परंतु केव्हा अर्जुनाचें पात्र व केव्हां द्रौपदीचें पात्र हीं कल्पनेप्रमाणें असावीं तशीं शरिराने भरदार नसल्यामुळे रंग चढत नसे. तथापि या नाटकावर बलवंत संगीत मंडळीला एकंदरीने पैसा चांगला मिळाला, व मलाहि त्यांनी मोबदला चांगला दिला.
 (७९) माझे शेवटचें नाटक 'संत भानुदास ' वऱ्हाडांत नवीन स्थापन झालेल्या कोणत्याशा अेका ( आता नांवहि आठवत नाही) नाटक मंडळी- करिता मी हे नाटक लिहिलें. राजापूर नाटक मंडळीचें यश पाहून याहि नाटकमंडळीला साधुसंतांचीं नाटकें करावीशीं वाटलीं; व त्यांनी मला अेखादे संतचरित्राचेंच कथानक घेण्यास सांगितल्यावरून मी भानुदास-चरित्र घेतलें. ही