Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१२२]

[माझा जन्मभरचा


वेगवेगळें असतें. त्यांत निखालस श्रेष्ठपणा अेकीकडे व निखालस कनिष्ठपणा अेकीकडे असें नसतें. कांही राजे लोक पंडितांना पदरीं बाळगून त्यांना मान देतात याचें कारण हें की, वर दर्शविलेल्या दोन स्वभावप्रकारांपैकी 'विनयदूषित' या प्रकाराचा स्वभाव देवाने त्याना अुपजत दिलेला असतो. पण दुसरेंहि कारण असें की, पदरच्या शास्त्रीपंडितांचा परामर्शपूर्वक गौरव केल्याने स्वतः राजांना अेक विशेष प्रकारची कीर्ति मिळते. अितिहासांत ऑगस्टस, चवदावा लुअी, अेलिजाबेथ, व्हिक्टोरिआ, तसेंच भोज, विक्रम, श्रीहर्ष हे राजे अितर रीतीने कीर्तिमान असतां, या विद्वत्परामर्षामुळेहि त्यांना अेक स्वतंत्र वेगळ्या प्रकाराची कीर्ति मिळाली यांत शंका नाही. तथापि राजांना होणाऱ्या या कीर्तिलाभापेक्षा राजाश्रयाने विद्येला 'ठाव नांव व वाव' मिळण्याचा जो लाभ होतो तोच अधिक म्हणावा लागेल. तात्पर्य, राजा व कवि हे दोघेहि सुज्ञ असतील तर अेकमेकांविषयी समानतेने आदरभावच ठेवतील.

 ( ११५) म्हणून ' अहंकारदूषित ' आणि ' विनयदूषित' या दोहोंहून अेक तिसरीहि भूमिका निर्माण होअूं शकेल. कारण कोणाहि गुणी मनुष्याने दुस-या कोणालाहि कमी लेखूं नयेच हें ठीक, पण स्वतःला तरी कमी कां लेखावें ? अीश्वराने गुणाची वाटणी करतांना वैचित्र्य साधून न्यायबुद्धि राखली आहे असें म्हणतां येअील. किंबहुना वैचित्र्य साधल्यामुळेच त्याला न्यायबुद्धि राखतां आली असें म्हणावें. कोणत्या अेकाच वर्गाला सर्वच गुणवत्ता तो अर्पण करील तर अितरांवर अन्याय होअील. आणि अेकाच वर्गाला त्याने ती अर्पण केली तर आडव्या समांतर लहान मोठेपणाला वाव अुरणार नाही. पण निरनिराळ्या वर्गाला निरनिराळ्या गुणवत्तेची देणगी दिल्याने सर्वच आपणाला मोठे किंवा बरोबरीचे म्हणूं शकतात.

 ( ११६) रोमन कवि होरेस याच्या चरित्रांत ही गोष्ट मला पर्यायाने वाचावयास सापडली ती अशी. रोमन बादशहा ऑगस्टस व प्रसिद्ध कवि होरेस हे व्यक्तिशः परम स्नेही होते. राजाच्या सांगण्यावरून होरेसने अनेक कविता रचल्या व त्या निरनिराळ्या राजदरबारप्रसंगी म्हटल्या जात. पण होरेसने स्वतःच्या आवडीने रचलेल्यापैकी अेकहि कविता