पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
८२०
 

पाश्चात्य विद्यांचा अभ्यास करून स्वातंत्र्यलढ्याची तयारी चालविली होती. हिंदुस्थान हे एक राष्ट्र आहे व ते स्वतंत्र झाले पाहिजे, ब्रिटिश लोक येथून गेले पाहिजेत, हे लोकहितवादींच्या पासून महाराष्ट्रीयांच्या मनात होते. स्वातंत्र्याकांक्षा व पाश्चात्य विद्य यामुळे येथे लोकांत व्यक्तित्व जागृत झाले, त्यांची अस्मिता प्रदीत झाली. या अस्मितातूनच सर्व प्रकारचे मानवी कर्तृत्व उदयास येत असते. महाराष्ट्रात तसे ते उदयास आले आणि स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्याची प्रेरणा तो भारताला देऊ शकला. आणि त्याचबरोबर विद्या, कला या क्षेत्रांतही तो मोठे वैभव प्राप्त करून येऊ शकला.
 स्वातंत्र्यानंतर मात्र या सर्व दिव्य प्रेरणा मंदावलेल्या दिसतात. ध्येयवाद, त्याग, लोकसेवा, भव्य आकांक्षा या सर्व गुणांचा महाराष्ट्रातूनच नव्हे, तर सर्व भारतातून लोप झाला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या एकदोन वर्षातच नेहरू, पटेल सांगू लागले की इतके दिवस त्याग केला, आता भोगावयाचे आहे, अशी लोकांची वृत्ती झाली आहे. महाराष्ट्रही याला अपवाद नाही. वास्तविक त्याग, ध्येयवाद यांची स्वातंत्र्यलढ्याच्या काळात एकपट जरूर असली तर नंतरच्या काळात दसपट जरूर होती व आहे. महाराष्ट्राच्या हे ध्यानात येईल काय ? येथे निम्मी जनता अजून दारिद्र्याच्या खाईत पडलेली आहे. तिची उन्नती कशी होणार ? लो. टिळक तरुणांना सांगत असत की 'तुम्ही ग्रॅज्युएट रामदासी व्हा.' सर्व देशभर संचार करून पाश्चत्त्य विद्येच्या आधारे जनतेत प्रबोधन घडवून आणा, असा याचा अर्थ आहे. हे व्रत महाराष्ट्रीय तरुणांनी घेतले तर महाराष्ट्र संस्कृतीला पुन्हा उत्कर्षकाळ प्राप्त होईल. उद्योग, व्यापार शेती, विद्या, कला यांत पुन्हा ती संस्कृती नवे विक्रम करील. टिळकांचा संदेश कृतीत आणण्याची सद्बुद्धी महाराष्ट्रीय तरुणांना होवो व महाराष्ट्र संस्कृतीचे पुनरुज्जीवन त्यांच्या हातून घडो, अशी शुभेच्छा प्रकट करून त्या संस्कृतीचे हे प्रदीर्घ विवेचन संपवितो.