पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९५
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

होती हे उघड आहे.

लोकसंगीत
 कीर्तनाखालोखाल गायनाची परंपरा चालू ठेवणारे लोक म्हणजे वासुदेव, गोंधळी, भुत्या, वाघ्यामुरळी, भराडी, पोतराज, जोगती हे होत. वासुदेवाच्या मुखी रंगणारी गाणी विविध प्रकारची आहेत. त्यातली काही भक्तीचा महिमा रंगविणारी आहेत; काही बालकृष्णाचे चरित्र सांगणारी आहेत. गाेंधळी हा आबालवृद्ध श्रोत्यांना रंजविण्यासाठी कृष्णलीला, गौळणी, पोवाडे अशी विविध प्रकारची गीते आकर्षक पद्धतीने गातो. भुत्या सर्वत्र हिंडतो व तुळजापूरच्या आई भवानीची गाणी तन्मयतेने गातो. वाघ्यामुरळीच्या मुखीची गाणी शाहिरी ढंगाची आहेत. ते प्रामुख्याने खंडोबाची गीते गातात. त्यात खंडोबा व बाणाई यांच्या शृंगाराची गाणीही असतात. भराडी हा अनेक पुराणकथा व लोककथा गीतबद्ध करून लोकांना सांगतो. पोतराजाची गाणी ही मरीआईची किंवा महालक्ष्मीची असतात. याशिवाय त्याच्या पाठात काही कथात्मक गीतेही असतात. पार्वती भिल्लीण झाली ही कथा त्यात नेहमी असते. जोगती आणि जोगतिणी हे यल्लमाचे उपासक आहेत. यांच्या गीतांत यल्लमाचे माहात्म्य सांगणारी अनेक गीतं असतात.
 कौटुंबिक गीते, बालगीते, स्त्रीगीते, मंगळागौरीची गीते ही सर्व लोकगीताच्या परंपरेतलीच होत. लोकगीतांना शास्त्रीय संगीत म्हणता येणार नाही. पण लोकांच्या गायनश्रवणाच्या अभिरुचीची ती तृप्ती करतात व ती अभिरुची समाजात पसरवून त्याचे मनोरंजन करतात यात वाद नाही.

नाट्यसंगीत
 यानंतर नाट्यसंगीताचा विचार करायचा. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी साग्रसंगीत अशी शाकुंतल, सौभद्र ही नाटके रंगभूमीवर उभी केली, त्यामुळे संगीताचा सर्व लोकांत प्रसार झाला. कीर्तनपरंपरेतील लोकप्रिय चाली, लावणी ढंगाच्या चाली आणि कर्नाटकी व हिंदुस्थानी यांचा मिलाफ यामुळे किर्लोस्करांचे संगीत नाटक हा घरातला विषय झाला. सुदैवाने त्या वेळी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'ला भाऊराव कोल्हटकर, मोरोबा वाघुलीकर, बाळकोबा नाटेकर असे गायक नट लाभले. या सगळ्यांत भाऊराव कोल्हटकर हे अग्रगण्य होते. तेजःपुंज सौंदर्य आणि सुरेल, कर्णमधुर गायन हे भाऊरावांचे विशेष होते. त्यांनी देवलांच्या मार्गदर्शनामुळे सुभद्रा, शकुंतला, मंथरा या स्त्रीभूमिकांप्रमाणेच पुंडरीक, चारुदत्त, कोदंड या पुरुष भूमिकाही तितक्याच यशस्वी केल्या. यानंतर सर्व भारतात ज्यांची अमर कीर्ती झाली ते नारायणराव राजहंस अथवा बालगंधर्व हे उदयास आले. प्रथम ते 'किर्लोस्कर कंपनी'त होते. पुढे त्यांनी स्वतंत्रपणे 'गंधर्व नाटक मंडळी'ची स्थापना केली. कृ. प्र. खाडिलकरांनी १९११