पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७९४
 

रेडिओवरून 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत गाण्याचा मान त्यांना देण्यात आला होता. भारतातून चीनला जे सांस्कृतिक शिष्टमंडळ गेले होते त्यात हिराबाईचा समावेश झाला होता. या क्षेत्रात महाराष्ट्राला त्यांनी कशी कीर्ती मिळवून दिली ते यावरून समजेल.
 माणिक वर्मा यांचे नाव एका दृष्टीने या सर्वापेक्षा आगळे आहे. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन, भावगीत, लावणी या सर्व प्रकारच्या संगीतात त्यांचा अप्रतिहत संचार आहे. सातव्या वर्षीच त्यांचे गाणे ऐकून बालगंधर्वांनी, 'तुझ्या गळ्यात माणिक मोती आहेत, तू मोठी गायिका होशील', असा आशीर्वाद त्यांना दिला होता. आप्पासाहेब भावे, सुरेशबाबू, इनायत खां आणि जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडून त्यांनी विद्या मिळविली आणि भारतात व युरोपातही अपूर्व कीर्ती जोडली. दिल्ली रेडिओवरून त्यांचे अनेक राष्ट्रीय कार्यक्रम झाले. मैफलीही त्यांनी अनेक गाजविल्या. आणि युरोपीय लोकांना प्रथमच भारतीय कंठसंगीताची गोडी दाखवून दिली. तोपर्यंत आपले वाद्यसंगीतच तिकडे जात असे. कंठसंगीत त्यांना आवडणार नाही, असा समज होता. माणिक वर्मा यांनी तो भ्रम दूर केला आणि चांगल्या पस्तीस बैठकी त्यांनी गाजवल्या. भारतातील सर्व सभासंमेलनांत त्या मानाने गेल्या आहेत आणि आकाशवाणीवरील सर्वश्रेष्ठ श्रेणी त्यांनी मिळविली आहे. अशा रीतीने, 'देवा, मोठी गायिका होशील', हा बालगंधर्वांचा आशीर्वाद त्यांनी खरा करून दाखविला आहे.

कीर्तन संस्था
 शास्त्रीय संगीताचा विचार करताना कीर्तनसंस्थेचा विचार सहजच मनात येतो. भारतात कीर्तनसंस्था फार पुरातन काळापासून नावारूपास आलेली आहे. नारद हे या संस्थेचे आद्य प्रवर्तक असे पुराणे सांगतात. संतांपैकी नामदेवांची कीर्तने प्रसिद्ध आहेत. पण ते गात असावेत असे वाटत नाही. समर्थ रामदासस्वामींनी 'संगीत, नृत्य, तानमान' हे कीर्तनाला अवश्य म्हणून सांगितले आहे. तेव्हा त्या वेळी कीर्तनकार संगीताचा अभ्यास करीत असावेत, असे वाटते. अलीकडच्या काळात मात्र कीर्तनकार शास्त्रशुद्ध संगीताचा अभ्यास करीत, हे त्यांच्या चरित्रांवरून दिसते. देवजीबुवा गोगटे, चिलुबुवा फलटणकर, नानाबुवा बडोदेकर, ताहराबादकर, कऱ्हाडकर, सांगलीकर, नाशिककर इ. या क्षेत्रातली नावे प्रसिद्ध आहेत. नाट्यसंगीतात प्रारंभी प्रसिद्धीस आलेले प्रख्यात गायक भाऊराव कोल्हटकर, मोरोबा वाघुलीकर, बाळकोबा नाटेकर यांचा संबंध प्रथम कीर्तनसंस्थेशीच आला होता. त्यांच्या गाण्यावर कीर्तनसंस्थेतील गाण्याची छाप होती, असे जाणकार म्हणतात.
 कीर्तनातील गायनाची तमाशातील गायनावरही छाप होती असे म्हणतात. मागल्या काळी, प्रसिद्ध तमासगीर रामजोशी पुढे तमाशा सोडून कीर्तनकार झाले हे प्रसिद्धच आहे. पुढच्या काळातही कीर्तनाच्या लोकप्रियतेमुळे तमाशातील गायकीवर कीर्तनातील गायकीचा परिणाम झाला असणे पूर्ण शक्य आहे. तेव्हा कीर्तनसंस्था अशी सर्वव्यापक