पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७९२
 

 त्यांनी महाराष्ट्रात आणलेले खटतोडी, खोकर, मालागौरी, पूर्वासावनी, हेमनट, कामोदनट इ. अनेक राग, ते येथे येण्यापूर्वी, महाराष्ट्रीय संगीतज्ञांना माहीतही नव्हते. 'आम्हांलासुद्धा हे अगम्य आहे' असे भास्करबुवा बखले त्याविषयी म्हणत, मग इतरांची कथा काय !
 अल्लादिया खां हे जयपूर घरण्याचे होत. त्यांनी येथल्या वास्तव्यात आपली विद्या देऊन अनेक शिष्य तयार केले. सुरश्री केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, गोविंदबुवा शाळिग्राम, शंकरराव सरनाईक, लीलाबाई शिरगावकर इ. अनेकांना त्यांनी तालीम देऊन तयार केले. महाराष्ट्रावर खांसाहेबांचे इतके प्रेम होते की 'महाराष्ट्रीयांसारखे रसिक व मर्मग्राही श्रोते इतर कोणत्याही प्रांतात आढळत नाहीत', 'कलाविकासाची पारख महाराष्ट्रालाच अधिक', असे ते स्पष्टपणे सांगत.
 सर्व भारतात महाराष्ट्राला संगीतक्षेत्रात ज्यांनी अग्रस्थान मिळवून दिले, त्याला अमाप कीर्ती मिळवून दिली, त्या सात स्वरश्रींची माहिती वर दिली आहे. महाराष्ट्राचे संगीत त्यांच्या पुण्यावरच आज उभे आहे. आज महाराष्ट्रात जे प्रख्यात गवई आहेत ते बहुधा सर्व यांपैकी कोणाचे ना कोणाचे तरी शिष्य आहेत.
 प्रो. बी. आर देवधर हे नाव संगीतज्ञ म्हणून महाराष्ट्रात विख्यात आहे. ते विष्णुबुवा पलुसकरांचे शिष्य. यांनी पौर्वात्य संगीताबरोवर पाश्चात्य संगीताचाही उत्तम अभ्यास केला आहे. मुंबईला 'इंडियन स्कूल ऑफ म्युझिक' ही यांची संस्था फार प्रसिद्ध आहे. कुमार गंधर्वासारखे कीर्तिवंत गवई येथेच गाणे शिकले.
 संगीताच्या बाबतीत आणखी एक महाराष्ट्राचा विशेष म्हणजे संगीतशास्त्रावर व संगीतसमीक्षेवर ग्रंथ लिहिणारे महाराष्ट्रात जितके पंडित झाले तितके भारताच्या दुसऱ्या कोणत्याही प्रांतात झाले नाहीत. गं. भि. आचरेकर, बाळासाहेब आचरेकर, रघुवीर पेंटर, गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, वा. ह. देशपांडे, अ. गं. मंगरुळकर, गोपालकृष्ण भोबे, अरविंद गजेंद्रगडकर, ग. ह. रानडे, ना. सी. फडके ही नावे शास्त्रीय विवेचनासाठी प्रसिद्ध आहेत. यांतले काही स्वतः गायकही होते व संगीत दिग्दर्शकही होते. त्यामुळे त्यांच्या लेखनाला विशेष बोज प्राप्त झाला आहे.
 यानंतर काही प्रसिद्ध गायिकांचा परिचय करून व्यावयाचा आहे. बावलीबाई पालकर, अंजनीबाई मालपेकर, केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, हिराबाई बडोदेकर आणि माणिक वर्मा या त्या गायिका होत. यांची संगीतसेवा वर सांगितलेल्या स्वरश्रींच्या इतकीच महत्त्वाची आहे.
 यांतल्या बऱ्याच गायिका गोव्याच्या आहेत. त्यांत बावलीबाईना जाणकार अग्रपूजेचा मान देतात. पाऊणशे वर्षापूर्वी सबंध भारतामध्ये नामांकित गायिका म्हणून त्यांचा लौकिक होता. नत्थन खां यांच्या त्या शिष्या. त्यांच्या जवळून पाठ घेऊन पुढे त्या इतक्या निपुण झाल्या की तत्कालीन थोर गवय्ये, उस्ताद, खांसाहेब सुद्धा त्यांची बैठक झाल्यानंतर आपली मैफल रंगविण्याचे धाडस करीत नसत. भास्करबुवा बखले,