पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८१
विचारप्रधान साहित्य
 

१९४५ साली ओगले यांनी 'महाराष्ट्र' याचे दैनिकात रूपांतर केले. पुढे ते वऱ्हाडचे मुखपत्रच झाले.
 अलीकडच्या काळात या वृत्तपत्रांच्या क्षेत्रात जयंतराव टिळक, तटणीस, शंकरराव मोरे, पां. वा. गाडगीळ, प्रभाकर पाध्ये, अनंत काणेकर, यदुनाथ थत्ते, ह. रा. महाजनी, पु. रा. बेहरे, ग. वा. बेहरे, अनंत पाटील, माधव गडकरी, त्र्यं. वि. पर्वते, बाळासाहेब पाटील, रॉय किणीकर ही नावे विशेष प्रसिद्ध आहेत.

३. नियतकालिके


 हा वृत्तपत्रांचा विचार झाला. आता इतर नियतकालिकांचा विचार करू. १८६७ साली रा. भि. गुंजीकर यांनी 'विविधज्ञानविस्तार हे मासिक काढले. त्याकाळच्या बहुतेक सर्व संशोधकांचे, पंडितांचे, अभ्याकांचे लेख त्यातून येत असत. त्यामुळे हे मासिक मराठीचे भूषण ठरले आहे. १८९० साली हरिभाऊ आपटे यांनी 'करमणूक' हे साप्ताहिक सुरू केले. हे अतिशय उच्च दर्जाचे होते. हरिभाऊंच्या कादंबऱ्या, उद्बोधक चरित्रे, उपयुक्त माहिती, स्फुट गोष्टी, टीकालेख इ. विविध प्रकारच्या वाङ्मयामुळे ते लोकप्रिय झाले. १८९१- १९०० या काळात महाराष्ट्र कोकिळ, दीनमित्र, मराठी शालापत्रक (चित्रशाळा), ग्रंथमाला इ. अनेक मासिके निघाली. त्यांतील विजापूरकरांचे कोल्हापूरचे 'ग्रंथमाला' हे उल्लेखनीय आहे. त्यातून अनेक प्रथितयश पंडितांचे निबंध व ग्रंथ बारा वर्षात प्रसिद्ध झाले. पुढच्या काळातील 'चित्रमय जगत' हे मासिक विशेष कीर्ती पावले. युद्धविषयक लेख, शास्त्रीय माहिती, इतर सामाजिक, राजकीय विषयांवरचे अभ्यासपूर्ण लेख, यामुळे हे मासिक अल्पावधीतच लोकप्रिय झाले.
 त्यानंतरच्या काळात मनोरंजन, चित्रा, मौज, सत्यकथा, धनुर्धारी, मराठा वैभव, केरळ कोकीळ, रत्नाकर, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, वसंत, हंस, वाङ्मयशोभा, सह्याद्री, समाजस्वास्थ्य अशी नियतकालिके निघाली. त्यातील 'किर्लोस्कर' मासिकांनी फार महत्त्वाची कामगिरी केली आहे. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, औद्योगिक सर्व क्षेत्रांतील अत्यंत पुरोगामी लेख छापावयाचे, असा त्यांचा बाणा होता. डॉ. केतकर, सावरकर, फडके अशा थोर लेखकांचे लेख अनेक वर्षे किर्लोस्करांनी छापले. स्त्रीजीवन- सुधारणेविषयी त्यांचा कटाक्ष होता. अजूनही 'किर्लोस्कर' व 'स्त्री' या मासिकांनी आपली कीर्ती टिकवून धरली आहे. 'रत्नाकर' हे मासिक अल्पकाल जगले. पण तेवढ्यात ते विशेष कीर्ती मिळवून गेले. 'सह्याद्री' मासिकाचे काही काळ स्वतः तात्यासाहेब केळकर संपादक होते. तेव्हा त्याचा दर्जा काय असेल याची कल्पना येईलच. 'मौज,' 'सत्यकथा' यांचे नवसाहित्य छापणे हे वैशिष्ट्य होते. भागवत बंधूंना याचे श्रेय आहे. 'वसंत' ' हंस' यांनी अल्पावधीत सर्व महाराष्ट्रभर नाव मिळावले. काटदरे, अंतरकर यांनी कोणत्याही पक्षाचा पुरस्कार न करता सर्व विषयांवरील लेख व कथा प्रसिद्ध करण्याचे