पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७८०
 

राजकीय विचार असत. त्यामुळे ही दोन्ही पत्रे सरकारी रोषाला बळी पडली. ती विशेष उल्लेखनीय आहेत ती यामुळेच.
 १८७४ मध्ये विष्णुशास्त्री यांची निबंधमाला सुरू झाली. आणि महाराष्ट्रात नवयुग सुरू झाले. त्यांनीच पुढे १८८१ साली आगरकर व टिळक यांच्या साह्याने 'केसरी' पत्र सुरू केले. या केसरीपत्राला पुढे न. चिं. केळकर, कृ. प्र. खाडिलकर, ज. स. करंदीकर यांसारखे खंदे संपादक लाभले. पण त्यांची कीर्ती लो. टिळकांच्या मुळे झाली.
 १८७७ साली कोल्हापुरास 'दीनबंधू' हे साप्ताहिक भालेकर यांनी सुरू केले. म. फुले यांच्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली होती. हे पत्र मागासलेल्या बहुजनसमाजाचे होते. त्यात त्यांच्याविषयी लेख येत.
 १८९८ साली शि. म. परांजपे यांनी 'काळ' हे पत्र सुरू केले. त्यात दहशतवादी क्रांतिप्रेरक लेख येत. त्यामुळे १९०८ साली ते बंद पाडण्यात आले. १९०५ साली भोपटकर बंधूनी 'भाला' हे पत्र सुरू केले. त्यातील लेख, त्यातील जहरी खवचट भाषेमुळे, त्यावेळी फार गाजले. १९१४ साली वऱ्हाडात 'महाराष्ट्र' हे पत्र सुरू झाले. त्याला इतकी कीर्ती मिळाली की त्याला वऱ्हाडातील 'केसरी' असे लोक म्हणू लागले. १९१५ साली अच्युतराव कोल्हटकर यांनी 'संदेश' हे पत्र सुरू केले. त्यांची लेखणी तेजस्वी होती. त्यामुळे त्याला लवकरच मोठी ख्याती मिळाली. महायुद्धाच्या चटकदार बातम्या आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे सुबोध विवेचन यामुळे 'संदेश' चा बोलबाला खूपच झाला. 'वत्सलावहिनीची पत्रे', 'बेटा गुलाब' यांचे त्यावेळी घरोघरी आवडीने वाचन होत असे.
 १९२० नंतर कृ. प्र. खाडिलकर हे 'केसरी' सोडून गेले. प्रथम त्यांनी 'लोकमान्य' हे दैनिक सुरू केले. पण पुढे ते सोडून त्यांनी 'नवा काळ' हे पत्र सुरू केले. ते काँग्रेसचे पत्र होते. त्यामुळे त्या काळात त्याचा प्रसार खूप झाला.
 त्यानंतरचे विशेष विख्यात पत्र म्हणजे 'सकाळ' हे होय. १ जानेवारी १९३१ साली ना. भि. परुळेकर यांनी ते पुण्यात सुरू केले. पूर्वी उपेक्षित असलेल्या अनेक क्षेत्रांत 'सकाळ'ने पाऊल टाकून बहुजन समाजाला आकर्षित केले. त्याचप्रमाणे विविध प्रकारची माहिती देण्याचा उपक्रम सुरू केल्यामुळे 'सकाळ' पत्राला लवकरच मोठे स्थान प्राप्त झाले.
 १९२० ते ३५ या काळात महाराष्ट्राच्या निरनिराळ्या जिल्ह्यांत बरीच वृत्तपत्रे निघाली. त्यातली बलवंत, ऐक्य, वैनतेय, सत्यवादी, कर्मयोगी ही उल्लेखनीय आहेत.
 १९३४ साली मुंबईला सदानंद यांनी 'नवशक्ती' हे दैनिक सुरू केले. शं. दा. जावडेकर हे त्याचे प्रथम संपादक होते. १९३७ साली कोल्हापुरास 'दैनिक पुढारी' हे पत्र सुरू झाले. १९३८ साली नाशिकला 'गावकरी' हे पत्र सुरू झाले. १९४४ साली नरकेसरी स्मारकमंडळाने नागपूरला 'तरुण भारत' हे पत्र सुरू केले. ग. त्र्यं. माडखोलकर हे प्रारंभापासून त्याचे संपादक असल्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने झाला.