पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७६६
 

विमा एजंट, संपादक, घरचे नोकर, कंपॉझिटर इ. समाजातल्या सर्व थरांतील व्यक्तींची विनोदी चित्रे त्यांनी रेखाटली असून अनेक सदोष घटनांचे विडबन केले आहे. त्यांचा विनोद स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ असून शुद्ध, सात्त्विक विनोदाचा तो आदर्शच आहे. 'स्टेटगेस्ट', 'लग्नसराई', 'स्टेशन स्टाफची मेजवानी', 'वरसंशोधन', 'गुंड्या- भाऊंचे दुखणे' हे त्यांचे लेख वरील विधानाची साक्ष देतील. ना. धों. ताम्हनकर यांचा 'दाजी' हाही स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोदाचाच नमुना आहे. त्याचे चालणे बोलणे, वागणे चाकोरीबाहेरचे असल्यामुळे हे साधले आहे. या दाजीने मराठी वाङ्मयात चांगली भर घातली आहे.
 याशिवाय कॅप्टन लिमये, शा. नी. ओक, डॉ. वर्टी, गो. ल. आपटे यांचेही लेखन विनोदी साहित्यात भर घालणारे आहे.
 आचार्य अत्रे हे विनोदाचे बादशहाच होते. नवयुग या साप्ताहिकात व मराठा या दैनिकात उपहास उपरोधाने रसरसलेले लेख लिहून त्यांनी प्रतिपक्षाला लोळवून टाकले आहे. अनेक क्षेत्रांतून अत्र्यांचा विनोद खळाळतो. विसंगती, विकृती, विडंबन, अतिशयोक्ती, यांची व स्वभावनिष्ठ, प्रसंगनिष्ठ व शब्दनिष्ठ अशी सर्व प्रकारच्या विनोदाची विपुल उदाहरणे अत्र्यांच्या लेखांतून सापडतील.
 अलीकडच्या काळात वि. आ. बुवा, रमेश मंत्री, बाळ गाडगीळ, बाळ सामंत, पु. ल. देशपांडे असे अनेक विनोदी लेखक उदयास आले आहेत. त्यातील पु. ल. देशपांडे यांचा विनोद हा निस्तुळ असा आहे. या सर्वांनी गेल्या तीस वर्षांत मराठी वाङ्मय विनोदाने समृद्ध केले आहे.

५. लघुनिबंध


 लघुनिबंध हाही ललित वाङ्मयाचाच एक प्रकार आहे. तात्त्विक निबंधांत गहन गंभीर विचार, काही शास्त्रीय सिद्धान्त यांचे तर्कशुद्ध विवेचन केलेले असते. आधार, प्रमाण, खंडणमंडण यांनी तो भरलेला असतो. याउलट लघुनिबंध हा अगदी खेळकर पद्धतीने, मित्राशी हितगुज करावे अशा शैलीने लिहिलेला असतो. स्वतःचे गमतीचे अनुभव त्यात सांगितलेले असतात. आणि मुख्य म्हणजे काव्याप्रमाणे यातही आत्माविष्कार असतो. आपल्या अंतरीच्या भावभावना, मनातील लहरी, विचार, विकार लेखक लघुनिबंधात मोकळेपणाने प्रगट करतो आणि या वैयक्तिक आत्मप्रकटीकारणामुळेच लघुनिबंधाला रम्य रूप येते. प्रारंभी काही सिद्धांत आणि शेवटी त्यावरचा निर्णय असे रूप लघुनिबंधाला कधी नसते आणि असले तरी ते सिद्धांत गमतीचे असतात. 'बाजार' हा फडक्यांचा लघुनिबंध पाहा. बाजारात जाणे ही जिकीर आहे असे सामान्यतः लोकांना वाटते, पण तो एक रम्य अनुभव आहे असे फडके म्हणतात. तत्त्वविचारात या सिद्धांताला कोणी सिद्धांत म्हणायलाही तयार होणार नाही आणि लेखकाची तशी अपेक्षाही नाही.