पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७५४
 

त्यांच्या काव्यात ठायीठायी दिसते. धर्म, समाज, नीती, राष्ट्र, निसर्ग, प्रेम, यांतील प्रत्येक विषयावर त्यांनी स्वतंत्रपणे आपले विचार प्रकट केलेले आहेत. 'तुतारी', 'स्फूर्ती', 'गोफण', 'नवा शिपाई' या त्यांच्या कविता या दृष्टीने अभ्यासण्याजोग्या आहेत. 'जग उलथून देण्याची भाषा' त्या प्रत्येक कवितेत आहे. बाळशास्त्री जांभेकरांच्यापासून बहुतेक सर्व लेखनाचा आशय हाच होता. तो इतके दिवस काव्यात प्रकट होत नव्हता. तो केशवसुतांनी प्रकट केला. म्हणून त्यांच्यापासून काव्याला निराळे वळण लागले. 'सतारीचे बोल', 'भृंग', 'पुष्पाप्रत', 'वातचक्र', 'झपूर्झा', 'म्हातारी' या प्रत्येक काव्यात केशवसुतांचे आत्मलेखन आढळते. कवीची वृत्ती दर वेळी, निबंधकाराप्रमाणे सारखीच असते असे नाही. भिन्नभिन्न कवितांत त्याच्या मनाच्या भिन्न भावना प्रगट होत असतात. यालाच आत्मलेखन किंवा आत्माविष्कार असे म्हणतात. काव्यविषयक काही कविता लिहून, 'कविता अशी असावी किंवा नसावी', हे सांगणारे तुम्ही कोण ? असा परखड सवाल केशवसुतांनी केला आहे. आणि काव्यविषयक सर्व रूढी व संकेत झुगारून देऊन त्यांनी आपले काव्य लिहिले आहे. मराठी काव्यात नवयुग अवतरले असे लोक म्हणू लागले, ते यामुळेच. रेव्हरंड टिळक, रेंदाळकर, विनायक, गोविंदाग्रज, बी, तांबे, बालकवी, दत्त, कवी गोविंद, सावरकर हे सर्व या नव्या युगातलेच कवी. प्रत्येकाची वृत्ती स्वतंत्र आहे. प्रत्येकाच्या काव्याचे रूप निराळे आहे. भावगीते, प्रणयगीते, निसर्गगीते जवळजवळ प्रत्येकाने लिहिली आहेत. तरी सर्वांचे वळण केशवसुती आहे यात शंका नाही.
 रेव्हरंड टिळक यांनी 'वनवासी फूल', 'सुशीला', 'बापाचे अश्रू', 'माझी भार्या' अशी चार दीर्घ काव्ये लिहिली आहेत. पण व्यक्तिवाद, आत्माविष्कार यांनी प्रत्येक काव्य अलंकृत झालेले आहे. भक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, रूढिभंजन या विषयांवर त्यांनी अनेक भावगीते लिहिली आहेत. शिंग, गुलाब, पाखरा येशिल का परतून, केवढे क्रौर्य हे, ही त्यांची काव्ये प्रसिद्ध आहेत. भक्ती, वैराग्य, क्षणभंगुरता, श्रद्धा ही त्यांच्याही काव्यात आहेत. पण त्यामुळे ही चाकोरी जुनी आहे, असे क्षणभरसुद्धा वाटत नाही.
 विनायक है राष्ट्रीय कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. वर्तमानापेक्षा भूतकालातच ते जास्त रमत. पन्ना, पद्मिनी, दुर्गावती, संयोगिता, वीरमती ही त्यांची काव्ये राष्ट्रीय विचारांनी रसरसलेली आहेत. 'स्त्री आणि पुरुष', 'प्रीती निमाली तर', 'सुवास', 'दोन मार्ग', अशी भावगीतात्मक रचनाही त्यांनी केली आहे.
 'आपण केशवसुत संप्रदायातील आहोत' असे रेंदाळकरांनी स्वतःच सांगितलेले आहे. रूढीवर हल्ला, सामाजिक सुधारणा, निसर्गाचे तत्त्वज्ञान हे यांच्या काव्यात अनेक ठिकाणी दिसून येते. तीव्र निराशावाद हे यांच्या काव्याचे प्रधान लक्षण आहे. 'गिधाड ', 'निवडुंगातून सुटका' इ. काव्यांवरून हे दिसेल.
 गोविंदाग्रज-गडकरी हे स्वतःला केशवसुतांचा चेला म्हणवितात. 'तुतारी मंडळ'